पोलंडहून पंतप्रधान मोदींचा रशिया-युक्रेनला संदेश, १० तासांच्या ट्रेन प्रवासानंतर उद्या 'कीव'ला पोहोचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 11:48 PM2024-08-22T23:48:44+5:302024-08-22T23:53:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टस्क यांनी युक्रेन आणि मध्यपूर्वेतील संघर्षांसह परस्पर हिताच्या महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडहून ट्रेनने युक्रेनला जाणार आहेत. मोदींचा पोलंडहून प्रवास सुरू झाला आहे. १० तासांचा प्रवास केल्यानंतर ते शुक्रवारी पोलंडहून युक्रेनची राजधानी 'कीव' येथे पोहोचतील. पोलंडमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले . त्यांनी भारतीयांचीही भेट घेतली. वॉर्सा येथे पंतप्रधान मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली.
दोन महिन्यांपासून Sunita Williams अंतराळात अडकल्या; गंभीर आजारांचा धोका वाढला...
पोलंडमध्ये रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा संघर्ष आपल्यासाठी चिंतेचा विषय असून युद्धभूमीवर कोणतीही समस्या सोडवता येत नाही. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी ते 'स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप'च्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण, सांस्कृतिक सहकार्य यासह द्विपक्षीय भागीदारीच्या विविध पैलूंवर त्यांनी व्यापक चर्चा केली.
अन्न प्रक्रिया, शहरी पायाभूत सुविधा, पाणी, इलेक्ट्रिक वाहने, ग्रीन हायड्रोजन, एआय, खाणकाम यासारख्या क्षेत्रात आर्थिक आणि व्यावसायिक सहकार्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. पीएम मोदी आणि डोनाल्ड टस्क यांनी लोक-लोकांमधील संबंध आणि सांस्कृतिक संबंध अधिक सुधारण्यावर भर दिला. या संदर्भात त्यांनी जामनगरचे महाराज आणि कोल्हापूरचे राजघराणे यांच्या दातृत्वाच्या जोरावर दोन्ही देशांमध्ये प्रस्थापित झालेल्या संबंधांचाही उल्लेख केला.
पंतप्रधान मोदींनी पोलंडमध्ये राष्ट्रपतींची भेट घेतली. बेलवेडेरे पॅलेसमधील बैठकीनंतर मोदी यांच्या सोशल मिडिया प्लॅटफ़र्म इंस्टाग्रामवर पोस्ट केले, 'वॉर्सा येथील राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांना भेटून आनंद झाला. भारत-पोलंड संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर आम्ही चर्चा केली. पोलंडसोबतच्या सौहार्दपूर्ण संबंधांना भारत खूप महत्त्व देतो. आगामी काळात आमच्या देशांमधील व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर पोस्ट केले की, दोन्ही नेत्यांमध्ये संभाषण झाले, यामध्ये विविध क्षेत्रात भारत-पोलंड भागीदारी मजबूत करण्यावर भर देण्यात आला.