"फ्रान्ससोबत माझं ४० वर्षांचं जुनं नातं", नरेंद्र मोदींनी सांगितला एका कार्डचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 11:13 AM2023-07-14T11:13:48+5:302023-07-14T11:50:23+5:30
PM Modi in France : पंतप्रधानांनी फ्रान्ससोबतच्या आपल्या ४० वर्षांपूर्वीच्या नात्यांबद्दल सांगितले
पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदींनीफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची येथे भेट घेतली आणि अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. दरम्यान, नरेंद्र मोदींनी पॅरिसमधील ला सीन म्युझिकलमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी फ्रान्ससोबतच्या आपल्या ४० वर्षांपूर्वीच्या नात्यांबद्दल सांगितले. "माझे फ्रान्स सोबतचे नाते नवीन नाही, ते अनेक दशके जुने आहे", असे नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदींनी भारतात सुमारे ४० वर्षांपूर्वी फ्रान्सचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या अलायन्स फ्रान्सेज (Alliance Francaise) सदस्यत्व घेतल्याची आवठण केली. नरेंद्र मोदी म्हणाले,"वैयक्तिकरित्या माझा फ्रान्सबद्दलचा स्नेह खूप मोठा आहे आणि मी ते विसरू शकत नाही. जवळपास ४० वर्षांपूर्वी गुजरातमधील अहमदाबाद येथून फ्रान्सचे सांस्कृतिक केंद्र Alliance Francaise सुरू झाले आणि आज भारतातील त्या सांस्कृतिक केंद्राचा पहिला सदस्य आपल्यासमोर बोलत आहे. काही वर्षांपूर्वी फ्रेंच सरकारने मला त्यांच्या सदस्यत्व कार्डाची फोटोकॉपी दिली होती आणि ती अजूनही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे."
याचबरोबर, लवकरच भारतीय पर्यटक आयफेल टॉवरवरही युपीआयद्वारे पेमेंट करू शकतील, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ते म्हणाले. "फ्रान्समध्ये युपीआयद्वारे पेमेंट करण्याचा करार करण्यात आला आहे. त्याची सुरुवात आयफेल टॉवरपासून होईल. भारतीय येथे यूपीआयच्या माध्यमातून रुपयात पैसे भरू शकतील. या करारामुळे भारतीय नवनिर्मितीसाठी मोठी नवी बाजारपेठ खुली होईल," असे नरेंद्र मोदी म्हणाले.
युपीआयद्वारे सामाजिक परिवर्तन
भारताचे UPI असो किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्म, त्यांनी देशात मोठा सामाजिक बदल घडवून आणला आहे. मला आनंद आहे की भारत आणि फ्रान्स या दिशेने एकत्र काम करत आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या वर्षी २०२२ मध्ये, युपीआय सेवा प्रदान करणारी आघाडीची संस्था, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) फ्रान्सच्या ऑनलाइन पेमेंट सिस्टम 'Lyra' सोबत एक सामंजस्य करार केला होता.
पाच वर्षांचा पोस्ट स्टडी व्हिसा
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, फ्रान्ससह अनेक देशांमध्ये अनेक भारतीय लोक संशोधनाशी जोडले गेले आहेत. आता त्यांना भारतीय इन्स्टिट्यूशन्समध्ये शिकविणे सुलभ करण्यात आले आहे. तसेच, फ्रान्समध्ये पोस्ट मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारताकडून पाच वर्षांसाठी पोस्ट स्टडी व्हिसा देण्यात येईल, असेही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.