“२०१४ मध्ये दिलेला शब्द पाळला”; सिडनीत २० हजार भारतीयांसमोर पंतप्रधान मोदींचा डंका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 04:13 PM2023-05-23T16:13:57+5:302023-05-23T16:20:36+5:30

PM Narendra Modi in Sydney Australia: भारताकडे क्षमतेची कमतरता नाही, जगात वेगाने भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

pm narendra modi address to indians in sydney australia tour | “२०१४ मध्ये दिलेला शब्द पाळला”; सिडनीत २० हजार भारतीयांसमोर पंतप्रधान मोदींचा डंका

“२०१४ मध्ये दिलेला शब्द पाळला”; सिडनीत २० हजार भारतीयांसमोर पंतप्रधान मोदींचा डंका

googlenewsNext

PM Narendra Modi in Sydney Australia: जपान दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे पंतप्रधान मोदी यांनी २० हजार भारतीयांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी एका कार्यक्रमात लिटिल इंडिया गेटवेची पायाभरणी केली. पंतप्रधान मोदी यांनी अल्बानीज यांचे आभार मानले. यावेळी संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून देत, दिलेला शब्द आपण पाळला, असे नमूद केले. 

२०१४ मध्ये इथे आलो होतो, तेव्हा तुम्हाला एक वचन दिले होते. वचन दिले होते. तुम्हाला भारताच्या पंतप्रधानपदासाठी पुन्हा २८ वर्षे वाट पाहावी लागणार नाही, असे सांगितले होते. आता मी तुमच्यासमोर आलो आहे. एकटा आलेलो नाही. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत आलो आहे. त्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढला, यावरून त्यांची भारतीयांप्रती असलेली आपुलकी दिसून येते, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संबंध हे ३ 'सी', 'डी' आणि 'ई' 

भारतीय वंशाचे समीर पांडे सिडनी येथील सिटी ऑफ पररामट्टा परिषदेत मेयर म्हणून निवडून आले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील संबंध हे ३ 'सी', 'डी' आणि 'ई' असल्याचे सांगितले. ३ सी म्हणजे कॉमनवेल्थ, क्रिकेट आणि करी. ३ डी म्हणजे डेमोक्रेसी, डायस्पोरा आणि दोस्ती तसेच ३ ई म्हणजे एनर्जी, इकॉनॉमी आणि एज्युकेशन यात दोन्ही देशांमधील संबंध हे परस्पर आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदींनी केले शेन वॉर्नचे स्मरण

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट संबंधांचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक केले. फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या निधनामुळे लाखो भारतीय दु:खी झाले होते, अशी भावना पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच क्रिकेटने आपल्याल दोन देशांना वर्षानुवर्षे जोडले आहे. आता टेनिस आणि चित्रपटांमुळेही आपल्यात संबंध जोडले जात आहेत. आमची खाण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी आता मास्टर शेफ आम्हाला जोडत आहेत. ऑस्ट्रेलियाने भारताची ही विविधता खुल्या मनाने स्वीकारली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 

जग संकटात असताना भारताने मदत केली

कोरोना काळात संपूर्ण जग संकटात होते. तेव्हा भारताने कोरोनाची लस जगातील अनेक देशांपर्यंत पोहोचवली, असे सांगत जगातील काही देशांतील बँकांची स्थिती दयनीय असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, भारतातील बँकिंग व्यवस्था मजबूत आहे. पुढील २५ वर्षांचे लक्ष्य ठेवून भारत पुढे जात आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश भारत आहे.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीही भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचे मान्य करत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी आवर्जुन सांगितले.

दरम्यान, हॅरिस पार्क येथील जयपूर स्वीट्समधील 'चाट' आणि 'जलेबी' अतिशय स्वादिष्ट आहेत. तुम्ही सर्वांनी माझा मित्र ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज यांना घेऊन जावे अशी माझी इच्छा आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना केले. भारताकडे क्षमतेची कमतरता नाही. भारतातही संसाधनांची कमतरता नाही. जगातील सर्वात मोठी आणि तरुण टॅलेंट फॅक्टरी भारतात आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

 

Web Title: pm narendra modi address to indians in sydney australia tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.