“योग्य व्यक्ती आहे, आपल्याला नक्की पुढे नेईल, हीच सार्वत्रिक जनभावना”: PM मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 08:58 AM2023-06-24T08:58:10+5:302023-06-24T08:59:33+5:30
संपूर्ण जगाच्या नजरा आता भारताकडे लागल्या आहेत. भारतात जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी ही योग्य संधी आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदीअमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींचा हा अमेरिका दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. वॉशिंग्टन येथील रीगन सेंटर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले. चुकीच्या पद्धतीने किंवा अन्य मार्गाने भारताबाहेर गेलेल्या १०० हून अधिक प्राचीन आणि ऐतिहासिक वस्तू भारतातून परत करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. या पुरातन वस्तू काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचल्या. या वस्तू परत केल्याबद्दल मी यूएस सरकारचे आभार व्यक्त करतो, असे सांगत मी जगात कुठेही गेलो तरी लोकांना हा योग्य माणूस आहे, असे वाटते. या व्यक्तीकडे प्रतिनिधित्व द्या, ही व्यक्ती आपल्याला योग्य ठिकाणी नेईल, हीच जनभावना मला दिसते, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
एखाद्या देशाने दुसरा देश आणि तेथील लोकांच्या भावनांचा आदर केला तर दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतात. गेल्या वेळीही अनेक ऐतिहासिक गोष्टी मला परत करण्यात आल्या होत्या. अमेरिकेकडूनही अशा ऐतिहासिक गोष्टी परत करण्यात येणार आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तसेच Google चे AI केंद्र १०० पेक्षा जास्त भाषांवर काम करेल. ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही, अशा विद्यार्थ्यांना अभ्यास करणे, शिकणे, माहिती मिळवणे सोपे जाईल. सर्वांत जुनी मानली गेलेली तमिळ भाषा आणि तमिळ संस्कृतीचा प्रभाव वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करत, जगातील सर्वात प्राचीन भाषा भारतात आहे आणि याचा सार्थ अभिमान वाटतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
भारतात जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी ही योग्य संधी
अमेरिका आमचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. ही क्षमता पुढे नेण्यात तुमचा सर्वांचा मोठा वाटा आहे. तुम्ही सर्वांनी इथे खूप नाव कमावले आहे. अमेरिकेच्या विकासात खूप योगदान दिले आहे. आता विकसित भारताची आपण शपथ घेतली आहे. तुमच्याकडून आणखी अपेक्षा आहेत. भारतात जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी ही योग्य संधी आहे. भारतातील स्टार्टअप्सच्या संधी आणखी वाढत आहेत. कौशल्य आणि तंत्रज्ञान आणि अनुभव भारताच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरतील, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
दरम्यान, संपूर्ण जगाच्या नजरा आता भारताकडे लागल्या आहेत. नव्या भारतात आत्मविश्वास परत आला आहे. हा भारत आहे, ज्याला आपला मार्ग आणि दिशा माहिती आहे. भारताला आपल्या निर्णयांवर आणि संकल्पांवर पूर्ण विश्वास आहे. भारतात पायाभूत सुविधांवर जितकी गुंतवणूक केली जात आहे, ती यापूर्वी कधीच झाली नव्हती, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.