“तुम्ही फक्त जागा सांगा, ती सगळी जमीन मंदिरासाठी देतो”; PM मोदींनी सांगितला ‘तो’ किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 09:39 PM2024-02-13T21:39:12+5:302024-02-13T21:39:43+5:30

PM Narendra Modi At Abu Dhabi: मंदिराचा प्रस्ताव मांडण्यात दिला, तेव्हा क्षणाचाही वेळ न दवडता यूएईच्या राष्ट्राध्यक्षांनी होकार दिला, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

pm narendra modi addressed people gathered at the zayed sports stadium in abu dhabi uae | “तुम्ही फक्त जागा सांगा, ती सगळी जमीन मंदिरासाठी देतो”; PM मोदींनी सांगितला ‘तो’ किस्सा

“तुम्ही फक्त जागा सांगा, ती सगळी जमीन मंदिरासाठी देतो”; PM मोदींनी सांगितला ‘तो’ किस्सा

PM Narendra Modi At Abu Dhabi: संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी प्रवासी भारतीयांची खूप काळजी घेतली. सन २०१५ मध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने अबुधाबीमध्ये मंदिराचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. क्षणाचाही वेळ न दवडता राष्ट्राध्यक्षांनी होकार दिला. ज्या जागेवर तुम्ही बोट ठेवला, ती सगळी जमीन तुम्हाला मंदिरासाठी देतो, असा शब्द राष्ट्राध्यक्षांनी दिला. अबुधाबीमधील भव्य आणि दिव्य मंदिराच्या उद्घाटनाची ऐतिहासिक वेळ आली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

१४ फेब्रुवारी रोजी हिंदू मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिराती येथे पोहोचले आहेत. झायेद स्पोर्ट्स सिटी येथे झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी हजारो प्रवासी भारतीयांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे कौतुक करताना मंदिर निर्माणासाठी केलेल्या सहकार्याबाबतची आठवण सांगितली. तसेच भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.

भारत आणि यूएई हे दोन्ही देश एकत्रितपणे पुढे जात आहेत. संयुक्त अरब अमिराती हा भारताचा तिसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. यूएई सातव्या क्रमांकाचा सर्वांत मोठा गुंतवणूकदार आहे. दोन्ही देश 'इज ऑफ लिव्हिंग' आणि 'इज ऑफ बिझनेस डूइंग' यावर खूप सहकार्य करत आहेत. दोन्ही झालेले करार याच वचनबद्धतेला पुढे नेत आहेत. अर्थव्यवस्थांचा विस्तार करत आहोत. तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देश सातत्याने मजबूत होत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

जगातील असा कोणता देश आहे ज्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे? तो कोणता देश आहे, तो आपला भारत आहे. स्मार्टफोन डेटा वापरण्यात जगात सर्वांत वरचा देश कोणता आहे, तो आपला भारत आहे. जगात सर्वाधिक दूध उत्पादन कोणत्या देशात होते? आपल्या भारत होते. इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश कोणता, तो आपला भारत आहे. जगातील सर्वांत मोठा मोबाईल निर्माता कोणता देश आहे? तो आपला भारत आहे. जगातील तिसरा सर्वांत मोठा स्टार्टअप इकोसिस्टम असलेला जगातील कोणता देश आहे, तो आपला भारत आहे. जगातील कोणता देश पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचला, तो आपला भारत आहे. जगातील असा कोणता देश आहे जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे, तो आपला भारत आहे. जगातील असा कोणता देश आहे ज्याने एकाच वेळी १०० उपग्रह पाठवण्याचा विक्रम केला आहे, तो आपला भारत आहे. जगातील कोणता देश आहे ज्याने स्वतः 5G तंत्रज्ञान विकसित केले, तो आपला भारत आहे, असे सांगत भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी प्रवासी भारतीयांसमोर ठेवला.

भारत एकापेक्षा जास्त नवीन विमानतळ बांधत आहे. भारत एकापेक्षा जास्त नवीन रेल्वे स्टेशन बांधत आहे. भारताची ओळख नव्या संकल्पना आणि नवनवीन शोधांमुळे निर्माण होत आहे. भारत एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जात आहे. डिजिटल इंडियाचे जगभरातून कौतुक होत आहे. UPI लवकरच संयुक्त अरब अमिरातीमध्ये लॉन्च होणार आहे. यामुळे तुम्ही भारतात तुमच्या कुटुंबातील सदस्यांना अधिक सहजपणे पैसे पाठवू शकाल. तिसऱ्या कार्यकाळात भारताला तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था करण्याची मोदी गॅरंटी आहे. मोदी गॅरंटी म्हणजे दिलेला शब्द पूर्ण करण्याची हमी आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. कनेक्टिव्हिटी, फिनटेक आणि डिजिटलसह विविध क्षेत्रात दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. कार्यक्रमस्थळी येताच 'मोदी-मोदी', 'मोदी है तो मुमकीन है' आणि 'भारत माता की जय'च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.
 

Web Title: pm narendra modi addressed people gathered at the zayed sports stadium in abu dhabi uae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.