PM मोदी अबुधाबीला पोहोचले, राष्ट्राध्यक्षांनी गळाभेट घेत स्वागत केले; दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 05:59 PM2024-02-13T17:59:08+5:302024-02-13T17:59:14+5:30
PM Narendra Modi At Abu Dhabi: एका भव्य हिंदू मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी यूएई दौऱ्यावर गेले आहेत.
PM Narendra Modi At Abu Dhabi: पंतप्रधान नरेंद्र मोदीसंयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांचे अबुधाबी येथे भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी पंतप्रधान मोदी यांची गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले. तसेच पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातीमधील प्रवासी भारतीयांशी संवाद साधणार आहेत.
१४ फेब्रुवारी रोजी हिंदू मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिराती येथे पोहोचले आहेत. २०१५ पासून पंतप्रधान मोदी यांचा सातवा तर गेल्या आठ महिन्यातील तिसरा यूएई दौरा आहे. अबुधाबी येथील पहिले हिंदू मंदिर भव्य स्वरुपात बांधण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी हजारो प्रवासी भारतीयांना संबोधित करणार
झायेद स्पोर्ट्स सिटी येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी प्रवासी भारतीयांना संबोधित करणार आहेत. हजारो प्रवासी भारतीय यावेळी हजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तर ७०० हून अधिक कलाकार आपली कला सादर करणार असल्याचे समजते. अबुधाबीमधील 'अल वाकबा' नावाच्या ठिकाणी २०,००० स्क्वेअर मीटर जागेवर हे हिंदू मंदिर बांधण्यात आले आहे. हायवेला लागून असलेले अल वाकबा, अबू धाबीपासून सुमारे ३० मिनिटांच्या अंतरावर आहे. मंदिरातील कोरीव कामातून अस्सल प्राचीन कला आणि स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना तयार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, २०२० च्या सुरुवातीला या मंदिराच्या मास्टर प्लॅनचे डिझाइन पूर्ण झाले. त्यानंतर भारत आणि यूएई तसेच समुदायाच्या पाठिंब्यामुळे मंदिराचे काम प्रगतीपथावर गेले, अशी माहिती देण्यात आली आहे.