भारतासाठी ब्राझील का महत्वाचा? PM मोदींचा दौरा देशासाठी किती फायदेशीर ठरणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 04:17 PM2024-11-18T16:17:16+5:302024-11-18T16:20:32+5:30
पंतप्रधान मोदी G20 शिखर परिषदेसाठी ब्राझीलच्या दौऱ्यावर गेले आहेत.
PM Narendra Modi Brazil : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ब्राझील दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते G20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील सहकार्य आणि भागीदारीला नवे बळ मिळेल अशी अपेक्षा आहे. भारत-ब्राझील चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्यकारी संचालक लिओनार्डो आनंदा गोम्स यांनी दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांची प्रशंसा केली आहे आणि ते वाढवण्याची अफाट क्षमता असल्याचे म्हटले. सध्या भारत आणि ब्राझीलमधील वार्षिक व्यापार 15 अब्ज डॉलर्सचा आहे.
या क्षेत्रांतील व्यापार वाढणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना लिओनार्डो गोम्स म्हणाले की, पंतप्रधान मोदी, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी निर्माण करत आहेत. भारत आणि ब्राझीलमधील व्यापार अनेक पटींनी वाढू शकतो यावर आमचा विश्वास आहे. ऊर्जा, कृषी, तंत्रज्ञान आणि वैद्यक यांसारख्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये व्यापक सहकार्याला वाव आहे. या क्षेत्रांसाठी करार झाला तर दोन्ही देशांना त्याचा फायदा होईल.
Landed in Rio de Janeiro, Brazil to take part in the G20 Summit. I look forward to the Summit deliberations and fruitful talks with various world leaders. pic.twitter.com/bBG4ruVfOd
— Narendra Modi (@narendramodi) November 18, 2024
जग भारताकडून प्रेरणा घेताहे
भारतात नुकत्याच झालेल्या G20 परिषदेचे कौतुक करताना गोम्स यांनी याला आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट परिषद असल्याचे वर्णन केले. भारताने ज्या पद्धतीने परिषदेचे आयोजन केले, ते इतर देशांसाठी उदाहरण आहे. भारताकडून प्रेरणा घेऊन ब्राझीलमध्येही असाच कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
जगभरातील दिग्गज येणार
18-19 नोव्हेंबर रोजी ब्राझीलमध्ये G20 शिखर परिषद होत आहे, ज्यामध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेक जागतिक नेते सहभागी होत आहेत. यावेळी सर्वांच्या नजरा पंतप्रधान मोदींच्या द्विपक्षीय बैठकांकडे लागल्या आहेत.