पंतप्रधान मोदींचा अमेरिकेत दिग्गजांशी संवाद, महासत्तेच्या भूमीत दिसली भारताची पॉवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 07:36 AM2023-06-22T07:36:05+5:302023-06-22T07:36:32+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान मोदी या देशाच्या दौऱ्यावर आहेत.

PM Narendra Modi discusses India's growth story with top American thought leaders | पंतप्रधान मोदींचा अमेरिकेत दिग्गजांशी संवाद, महासत्तेच्या भूमीत दिसली भारताची पॉवर

पंतप्रधान मोदींचा अमेरिकेत दिग्गजांशी संवाद, महासत्तेच्या भूमीत दिसली भारताची पॉवर

googlenewsNext

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील आघाडीचे अर्थतज्ज्ञ प्रो. पॉल रोमर, गुंतवणूकदार आणि हेज फंडाचे सहसंस्थापक रे डॅलिओ आणि इतर मान्यवर विचारवंतांची भेट घेऊन विचार विनिमय केला. या वेळी त्यांनी अनेक उद्योजकांची भेट घेत भारतात येण्याचे निमंत्रण दिले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान मोदी या देशाच्या दौऱ्यावर आहेत. मोदी आणि प्रो. रोमर यांनी आधार आणि डिजिलॉकरसारख्या नावीन्यपूर्ण साधनांचा वापर करण्याच्या मुद्यासह भारताच्या डिजिटल प्रवासावर चर्चा केली. शहरी विकासासाठी भारताकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांवरही त्यांनी चर्चा केली. 

या बैठकीनंतर मोदींनी ट्विट केले की, प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते, प्राध्यापक यांना भेटून आनंद झाला. जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यावर आम्ही विस्तृत संभाषण केले. मोदींनी डॅलिओ यांना भारतात आणखी गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले. त्यांनी खगोल भौतिकशास्त्रज्ञ नील डी ग्रासे टायसन यांच्याशीही चर्चा केली.

भारताने हाती घेतलेल्या विविध अंतराळ संशोधन मोहिमांसह अंतराळ क्षेत्रातील भारताच्या वेगवान प्रगतीवर त्यांनी विस्तृत चर्चा केली. भारताच्या नव्या राष्ट्रीय अंतराळ धोरणांतर्गत खासगी क्षेत्र आणि शैक्षणिक सहकार्यासाठीच्या संधींवरही चर्चा केली. 

पंतप्रधान मोदी नॅशनल सायन्स फाऊंडेशनला भेट देणार 
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडेन नॅशनल सायन्स फाऊंडेशनला भेट देणार आहेत. मोदी आणि बायडेन हे अमेरिका आणि भारतातील विद्यार्थ्यांची भेट घेतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. भारतीय अमेरिकन डॉ. सेतूरामन पंचनाथन नॅशनल सायन्स फाऊंडेशनचे प्रमुख आहेत.

२१ तोफांची सलामी  
वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे.

भारताचे पंतप्रधान किती वेळा अमेरिकेत गेले?
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत देशाच्या ९ पंतप्रधानांनी ३४ वेळा अमेरिकेला भेट दिली आहे. मोदी हे तिसरे भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांचे अमेरिकेच्या तीन वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांनी स्वागत केले आहे. यापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचेही तीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी स्वागत केले आहे.

मोदींचा दौरा खास का? 
८ वेळा पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत.
२ वेळा अमेरिकेच्या संसदेला संबोधित करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान असतील. या दौऱ्यात अनेक करार होण्याची शक्यता आहे. 
२२ जूनला मोदी वॉशिंग्टनला पोहोचणार आहेत. तेथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन स्वतः पंतप्रधान मोदींचे स्वागत करणार आहेत.

आघाडीच्या तज्ज्ञांची घेतली भेट
आरोग्य क्षेत्रातील आघाडीच्या अमेरिकन तज्ज्ञांच्या गटाचीही त्यांनी भेट घेतली. संवादात सहभागी झालेल्या तज्ञांमध्ये टेक्सास येथील नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनचे संस्थापक डीन डॉ. पीटर होटेझ आणि टेक्सास स्थित विरोवॅक्सचे सीईओ डॉ. सुनील ए. डेव्हिड यांचा समावेश होता.

मोदींचा मुक्काम कुठे? 
पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टन डीसीमधील प्रसिद्ध हॉटेल विलार्ड इंटरकॉन्टिनेंटलमध्ये मुक्काम करतील. हे अमेरिकेतील सर्वांत प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक आहे. ते व्हाईट हाऊसजवळ आहे. येथे अतिशय महत्त्वाचे पाहुणे उतरत असतात.

भेटीगाठी कुणाशी?
अमेरिकन बौद्ध अभ्यासक, लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते प्रो. रॉबर्ट थर्मन यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी बौद्ध मूल्ये कशी मार्गदर्शक ठरू शकतात यावर त्यांनी चर्चा केली. 
मोदींनी प्रतिष्ठित अमेरिकन गणितीय सांख्यिकीशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, सार्वजनिक विचारवंत आणि लेखक प्रो. नसीम निकोलस तालेब यांचीही भेट घेतली. ग्रॅमी पुरस्कार विजेती भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह यांच्याशीही पंतप्रधानांनी संवाद साधला.

भारताशी मैत्री अमेरिकेचा स्वार्थी खेळ : चीन
अमेरिका भारतासोबतचे संबंध मजबूत करीत आहे; कारण त्याला चीनचा आर्थिक विकास थांबवून पुढे जायचे आहे. अमेरिकेची ही रणनीती अपयशी ठरेल; कारण जागतिक पुरवठा साखळीत भारत किंवा इतर कोणताही देश चीनला हरवू शकत नाही,’ असा दावा चीनचे सर्वोच्च मुत्सद्दी वांग यी यांनी केला आहे. वांग यी म्हणाले की, भारताने अमेरिकेपासून स्वत:ला वाचवले पाहिजे. चीनला रोखण्यासाठी अमेरिका हा स्वार्थी खेळ खेळत आहे. भारताने विकासासाठी चीनशी व्यापार वाढविणे आवश्यक आहे. 

भारताशी मैत्री कायम राहील : रशिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा सर्वाधिक परिणाम रशियावर होणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु भारत हा आमचा पारंपरिक मित्र असून ही मैत्री भविष्यातही कायम राहील. एवढेच नव्हे, तर भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक तेलाची पूर्तता आमच्याकडून केली जाईल. त्यात कुठलीही कपात केली जाणार नाही, असे मत रशियाचे भारतातील राजदूत डेनिस एलिपोव्ह यांनी व्यक्त केले.

अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग, अमेरिकी सिनेट समितीचा प्रस्ताव
अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. अशा आशयाच्या ठरावावर अमेरिकी सिनेटची परराष्ट्र संबंधविषयक समिती विचार करणार आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले असताना हा ठराव सिनेट समितीसमोर विचारासाठी येणे हेदेखील महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 
 भारतालगत असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणे तसेच भूतानमधील भूभागावर हक्क सांगणे या चीनच्या कारवायांचा सदर ठरावात अमेरिकेने निषेध केला आहे. 

७५ खासदारांचे पत्र
भारत व अमेरिकेचे संबंध दृढ व्हावेत यासाठी नक्की प्रयत्न करा. मात्र भारतात धार्मिक असहिष्णुता वाढली आहे, इंटरनेट तसेच विचारस्वातंत्र्यावर बंधने लादली जात आहेत, पत्रकारांना लक्ष्य केले जात आहे. त्याबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करा, अशी मागणी ७५ अमेरिकी सिनेटर व अमेरिकी काँग्रेसमधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे केली आहे. 

Web Title: PM Narendra Modi discusses India's growth story with top American thought leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.