अमेरिकेत पंतप्रधान माेदींचा मैत्रीयाेग; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 07:00 AM2023-06-22T07:00:48+5:302023-06-22T07:02:04+5:30
राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिलेल्या निमंत्रणावरून अमेरिकेच्या ऐतिहासिक भेटीवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने अनोखा मैत्रीयोगही साधला.
न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी योग सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला १८० हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये याची नोंद झाल्याचा ‘योग’ही जुळून आला. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिलेल्या निमंत्रणावरून अमेरिकेच्या ऐतिहासिक भेटीवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने अनोखा मैत्रीयोगही साधला. या भेटीत विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजकांची चर्चा करून पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील मैत्रीसंबंधांना नवा आयाम दिला.
पंतप्रधान मोदी यांनी योगाचे वर्णन ‘सार्वत्रिक आणि कॉपीराइट्स व पेटंटपासून मुक्त’ असे केले. नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्रांचे सर्वोच्च अधिकारी आणि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. मोदी यांनी पांढरा योग टी-शर्ट आणि ट्राऊझर असे कपडे परिधान केले होते. ‘नमस्ते’ म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले की, ‘‘तुम्हा सर्वांना पाहून मला आनंद झाला. आज जवळपास प्रत्येक राष्ट्राचे प्रतिनिधी येथे हजर आहेत.’’ संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्लीच्या ७७व्या सत्राचे अध्यक्ष साबा कोरीसी, डेप्युटी सेक्रेटरी जनरल अमिना मोहम्मद आणि न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक ॲडम्स यांचीही यावेळी उपस्थिती होती. हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गेरे, अय्यंगार योगचे डेइड्रा डेमेन्स व प्रख्यात अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांचीही यावेळी उपस्थिती होती. (वृत्तसंस्था)
याेग आणि विश्वविक्रम
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) न्यूयॉर्क येथील मुख्यालयात बुधवारी आयोजिलेल्या कार्यक्रमात १८० हून अधिक देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. योगाशी संबंधित एखाद्या कार्यक्रमात सर्वाधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे झालेल्या विश्वविक्रमाची गिनीज बुकात नोंद करण्यात आली आहे.
दिग्गजांशी संवाद, गुंतवणुकीसाठी निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील आघाडीचे अर्थतज्ज्ञ प्रो. पॉल रोमर, गुंतवणूकदार आणि हेज फंडाचे सहसंस्थापक रे डॅलिओ आणि इतर मान्यवर विचारवंतांची भेट घेऊन विचारविनिमय केला.
मोदी-प्रो. रोमर यांनी आधार व डिजिलॉकरसारख्या नाविन्यपूर्ण साधनांचा वापर करण्याच्या मुद्द्यासह भारताच्या डिजिटल प्रवासावर चर्चा केली.
मोदींनी डॅलिओ यांना भारतात आणखी गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले. खगोल भौतिकशास्त्रज्ञ नील डी ग्रासे टायसन यांच्याशीही चर्चा केली.
मी मोदींचा फॅन : इलॉन मस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इलॉन मस्क यांनीही भेट घेतली. त्यानंतर मस्क म्हणाले की, भारतात इतर कोणत्याही मोठ्या देशापेक्षा अधिक क्षमता आहे. अन्य एका ठिकाणी बोलताना मस्क यांनी मोदींचे कौतुक करताना म्हटले आहे की, त्यांना खरोखर भारताची काळजी आहे.
मला आठवते की, सुमारे नऊ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रांमध्ये मला २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव देण्याचा मान मिळाला होता. त्यावेळच्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण जग एकत्र आले, हे पाहणे आश्चर्यकारक होते. संपूर्ण जग योगासाठी पुन्हा एकत्र आले हे आनंददायी आहे. योग भारतातून आला आहे आणि ती खूप जुनी परंपरा आहे.
- नरेंद्र माेदी, पंतप्रधान
योग शरीर आणि मन, मानवता आणि निसर्ग आणि जगभरातील लाखो लोकांना एकत्र करतो. त्यांच्यासाठी तो शक्ती, सौहार्द आणि शांतीचा स्रोत आहे.
- अँटोनियो गुटेरेस,
सरचिटणीस, संयुक्त राष्ट्र संघ