पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार, कधी होणार भाषण, तारीख जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 04:56 PM2024-07-16T16:56:07+5:302024-07-16T17:01:51+5:30
PM Modi, United Nations: परंपरेनुसार ब्राझील या चर्चेतील पहिला वक्ता असणार आहे
PM Modi, United Nations: संयुक्त राष्ट्रसंघाची ७९वी आमसभा (UN General Assembly) २१ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. युनायटेड नेशन्समधील शेकडो जागतिक नेते, धोरणकर्ते, तज्ज्ञ आणि महाधिवक्ते यांचा या आमसभेत सहभागी होणार आहेत. UNGAच्या उच्चस्तरीय चर्चेचा पहिला दिवस २४ सप्टेंबरला ठेवण्यात आला आहे. परंपरेनुसार ब्राझील या चर्चेतील पहिला वक्ता आहे आणि सत्राची सुरुवात त्यांच्या भाषणाने होईल. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन संयुक्त राष्ट्राला संबोधित करणार आहेत. यात महत्त्वाची बाब म्हणजे, संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या वक्त्यांच्या यादीनुसार, पंतप्रधान मोदी २६ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या उच्चस्तरीय अधिवेशनाला संबोधित करण्याची शक्यता आहे.
२१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात २४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत उच्चस्तरीय सर्वसाधारण चर्चा होणार आहे. चर्चेपूर्वी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आपला अहवाल सादर करतील. त्यानंतर चर्चेला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान मोदींनी याआधी २०२१ मध्ये संमेलनाला संबोधित केले होते. सध्या असलेली यादी ही अंतिम यादी नसली तरी, संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय अधिवेशनापूर्वी वक्त्यांची जी अंतिम यादी प्रसिद्ध होते त्यात फारसा बदल नसतो. सहसा कार्यक्रमाचे ठिकाणी, राजदूत किंवा भाषण करण्याच्या वेळेत बदल झाल्यास ती माहिती दिली जाते.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरेस या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात भविष्यासाठी विशेष शिखर परिषद आयोजित करत आहेत, ज्यामध्ये २०-२१ सप्टेंबर रोजी कृती दिन आणि २२-२३ सप्टेंबर रोजी शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. या शिखर परिषदेत जगभरातील नेत्यांना एकत्र आणून भविष्यातील करारांची अंमलबजावणी केली जाईल, ज्यात जागतिक डिजिटल करार आणि भावी पिढ्यांसाठीच्या घोषणांचा समावेश असेल.