मला भारतीय महिलेसोबत लग्न करायचं होतं; मोदींसोबतच्या भेटीत बायडन यांची 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 10:21 PM2021-09-24T22:21:42+5:302021-09-24T22:23:30+5:30
पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर; व्हाईट हाऊसमध्ये मोदी-बायडन यांची भेट
वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदाच मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांची भेट झाली. बैठकीत दोन्ही नेत्यांनी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. कोरोना संकट, हवामान बदल, इंडो-पॅसिफिक विषयांवर भारतासोबत काम करण्याची इच्छा बायडन यांनी बोलून दाखवली. याबद्दल मोदींनी बायडन यांचे आभार मानले.
बायडन यांनी केला मुंबई दौऱ्याचा उल्लेख
पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत बायडन यांनी मुंबई दौऱ्याचा उल्लेख केला. त्या दौऱ्याच्या आठवणींना बायडन यांनी उजाळा दिला. मला भारतीय वंशाच्या महिलेसोबत लग्न करायचं होतं, असं बायडन यांनी सांगितलं. 'मी जेव्हा उपाध्यक्ष होतो, तेव्हा या खुर्चीवर बसायचो. आता मी अध्यक्ष झालो आहे. आता तुम्ही माझ्या खुर्चीवर बसा,' असं बायडन म्हणाले.
तुमच्या नेतृत्त्वाखाली भारत-अमेरिका संबंधांच्या विस्ताराची बीज रोवलं गेलं आहे, अशा शब्दांत बायडन यांनी मोदींचं कौतुक केलं. 'अमेरिका-भारत एकत्रितपणे विविध प्रकारच्या जागतिक समस्यांवर तोडगा काढू शकतात. त्या दिशेनं काम करू शकतात. २००६ मध्ये मी उपाध्यक्ष होतो. २०२० पर्यंत भारत आणि अमेरिका आणखी जवळ येतील असं मी तेव्हाच म्हटलं होतं. माझे ते शब्द खरे ठरले,' असं बायडन यांनी म्हटलं.