आता अमेरिकेतही घुमतेय PM मोदींची लोकसभा निवडणुकीतील घोषणा, ट्रम्प यांच्या पक्षाने जशीच्या तशी उचलली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 03:07 PM2024-07-22T15:07:04+5:302024-07-22T15:07:31+5:30
अमेरिकेतील राष्ट्रपती पदाची निवडणूक आता रोमांचक वळणावर गेली आहे. एकीकडे ज्यो बायडेन यांनी आपले नाव निवडणुकीतून परत घेतले आहे ...
अमेरिकेतील राष्ट्रपती पदाची निवडणूक आता रोमांचक वळणावर गेली आहे. एकीकडे ज्यो बायडेन यांनी आपले नाव निवडणुकीतून परत घेतले आहे आणि कमला हॅरिस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. तर दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिक पक्षातही जबरदस्त उत्साह दिसत आहे. डेमोक्रॅट्स गटातील अनिश्चिततेच्या वातावरणाने डोनाल्ड ट्रम्प यांना बळ मिळाले आहे.
ट्रम्प यांनी जशीच्या तशी उचलली भाजप/मोदींची घोषणा -
आता अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने भाजप अथवा पंतप्रधान मोदींची घोषणा जशीच्या तशी उचलली आहे. रिपब्लिकन पक्षाने 'अबकी बार 400 पार' चा नारा दिला आहे. हीच घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक-2024 मध्ये दिली होती. यावेळचे वातावरण पाहता, 400 इलेक्टोरल मतांचा आकडा ओलांडला जाऊ शकतो, असे डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांना वाटते.
राष्ट्रपती होण्यासाठी किती मते लागतात? -
अमेरिकेतील एकूण 50 राज्यांमध्ये 538 इलेक्टोरल मते आहेत. यांपैकी ज्या उमेदवाराला 270 मते मिळतात, तो राष्ट्रपती होत असतो. साधारणपणे 20-20 राज्यांमध्ये दोन्ही पक्ष जिंकतात. मात्र उरलेल्या 10 राज्यांतून निर्णय येतो. सर्वसाधारणपणे जो पक्ष पॉप्युलर मते जिंकतो, तो राज्यातील सर्व इलेक्टोरल मतेही मिळवत असतो.
आतापर्यंत आलेल्या पोलनुसार, 20 राज्यांतून 251 इलेक्टोरल मते डोनाल्ड ट्रम्प यांना मिळू शकतात. जर सर्व्हेचा अंदाज खरा ठरला तर त्यांना केवळ 19 मतेच हवी आहेत. यातच, पेन्सिलव्हेनिया, एरिजोना, नवादा, मिशिगन सारख्या राज्यांतून डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी काही मते मिळू शकतात आणि त्यांचा राष्ट्रपती बनण्याचा मार्ग निश्चित होऊ शकतो. मात्र, हा विजय ऐतिहासिक व्हावा, यासाठी रिपब्लिक पक्षाचे नेते 400 पारची घोषणा देत आहेत. महत्वाचे म्हणजे, ज्यो बायडेन यांनी रेसमधून माघार घेतल्यानंतर, त्यांच्या आशा अधिकच वाढल्या आहेत.