मोदींच्या दौऱ्याने पाकिस्तानला मिरची झोंबली; अमेरिकेच्या दुतावासाला पाचारण केले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 09:03 AM2023-06-27T09:03:31+5:302023-06-27T09:03:56+5:30
अमेरिकेत असताना राष्ट्रध्यक्ष बायडेन यांच्यासोबत मोदींनी पाकिस्तान आणि दहशतवादावर एक संयुक्त निवेदन जारी केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिका आणि इजिप्तच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावरून परतले आहेत. अमेरिकेत असताना राष्ट्रध्यक्ष बायडेन यांच्यासोबत मोदींनी पाकिस्तान आणि दहशतवादावर एक संयुक्त निवेदन जारी केले होते. यावरून पाकिस्तानला मिर्च्या झोंबल्या आहेत. पाकिस्तानने अमेरिकेच्या दुतावासाला पाचारण केले आहे.
पाकिस्तानला आपल्या भूभागाचा वापर दहशतवादी हल्ल्यांसाठी अड्डा म्हणून होणार नाही याची काळजी घेण्यास या पत्रात म्हटले होते. यावर पाकिस्तानची आगपाखड सुरु झाली आहे. संयुक्त निवेदनात एकतर्फी आणि दिशाभूल करणारे संदर्भ असल्याचा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने केला आहे. पाकिस्तानविरुद्ध भारताच्या निराधार आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित कथनाला प्रोत्साहन देणारी विधाने देण्यापासून अमेरिकेने स्वत:ला परावृत्त केले पाहिजे. पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात दहशतवादविरोधी सहकार्य चांगलेच प्रगतीपथावर आहे. पाकिस्तान-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी विश्वास आणि समजूतदार वातावरण आवश्यक आहे, असे म्हटले आहे.
पाकिस्तानने दहशतवादी गटांचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. परंतु वॉशिंग्टनला त्याहून अधिक कारवाई करण्याची वकिली केली आहे. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि जैश-ए-मोहम्मद आणि त्यांच्या विविध आघाडीच्या संघटनांसह सर्व दहशतवादी गटांना कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी पाकिस्तानने पावले उचलावीत. यासाठी आम्ही हा मुद्दा पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे नियमितपणे मांडू, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅट मिलर यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या अमेरिकेला अनेक भेटी असूनही संयुक्त निवेदनाने इस्लामाबादला भारतातील सीमापार दहशतवादाचा प्रसारक बनवले आहे, अशी टीका इम्रान खान यांनी शहबाज सरकारवर केली होती.