संपूर्ण श्रीलंका ठप्प होणार? भारताचा शेजारी सर्वात मोठ्या संकटात; पंतप्रधानांनीच दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 10:28 PM2022-05-16T22:28:58+5:302022-05-16T22:29:16+5:30
श्रीलंकेवर मोठं संकट; परिस्थिती आणखी बिकट होणार, आयुष्य खडतर होणार; पंतप्रधानांनी सांगितलं
कोलंबो: भारताचा शेजारी असलेला श्रीलंका मोठ्या संकटात सापडला आहे. श्रीलंकेतील स्थिती दिवसागणिक बिघडत चालली आहे. श्रीलंकेत आता केवळ एक दिवस पुरेल इतकंच पेट्रोल शिल्लक आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान पदाची धुरा खांद्यावर घेतलेल्या रानिल विक्रमसिंघे यांनीच ही माहिती दिली आहे.
विक्रमसिंघे यांनी टीव्हीच्या माध्यमातून देशाला संबोधित केलं. एखाद्या व्यक्तीला, कुटुंबाला किंवा समूहाला वाचवणं हा माझा हेतू नाही. तर देश वाचवणं हे माझं लक्ष्य आहे, असं विक्रमसिंघे म्हणाले. येत्या काही दिवसांत आपलं आयुष्य आणखी खडतर होणार आहे. मी सत्य लपवणार नाही आणि जनतेशी खोटं बोलणार नाही. तुम्हाला माझं बोलणं भीतीदायक वाटेल. पण हेच सत्य आहे, असं विक्रमसिंघे म्हणाले. परदेशांकडून मदत मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्रीलंकन सरकारला खर्च चालवण्यासाठी २.४ ट्रिलियन श्रीलंकन रुपयांची गरज आहे. मात्र सरकारला महसूल केवळ १.६ ट्रिलियन इतका आहे. श्रीलंका संकटात सापडल्यापासून पहिल्यांदाच सरकारकडून सत्यता स्वीकारण्यात आली आहे. श्रीलंकेकडे असलेली परकीय गंगाजळी संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तेल आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करता येत नाही आहेत. श्रीलंकेची सरकारी एअरलाईन्स तोट्यात आहे. हा तोटा लोकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे एअरलाईन्सचं लवकरच खासगीकरण करण्यात येईल, असं विक्रमसिंघे यांनी सांगितलं.