पंतप्रधानांचा राजीनामा, श्रीलंकेत उसळला हिंसाचाराचा आगडोंब, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 06:57 PM2022-05-09T18:57:26+5:302022-05-09T18:58:35+5:30
Sri Lanka Crisis: आणीबाणी आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उफाळून आला आहे. सरकारचे विरोधक आणि समर्थकांमध्ये उफाळलेल्या हिंसाचारामध्ये श्रीलंकेतील सत्ताधारी पक्षाच्या खासदारांची हत्या झाली आहे.
कोलंबो - आणीबाणी आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उफाळून आला आहे. सरकारचे विरोधक आणि समर्थकांमध्ये उफाळलेल्या हिंसाचारामध्ये श्रीलंकेतील सत्ताधारी पक्षाच्या खासदारांची हत्या झाली आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार हत्या झालेल्या खासदारांचं नाव पी. अमरकीर्ती अथुकोराला असं आहे. तर हिंसाचारामध्ये १३० जण जखमी झाले आहेत.
याबाबत समोर आलेल्या वृत्तानुसार नित्तामबुवा येथे आंदोलकांनी कार अडवल्यानंतर सदर खासदारांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यामध्ये त्यांची कार अडवणारे दोन आंदोलक गंभीर जखमी झाले. त्यानंतर खासदार अमरकीर्ती हे मृतावस्थेत सापडले. दरम्यान, श्रीलंकेत उफाळलेल्या देशव्यापी हिंसाचारात १३९ जण जखमी झाल्याचे आणि दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारविरोधात आंदोलकांवर त्यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यात डझनभर लोक जखमी झाल्याचे वृत्त आल्यानंतर राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.