‘पीओके’ हा पाकिस्तानचा भाग नाही, इस्लामाबाद हायकोर्टात पाकची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 06:49 AM2024-06-03T06:49:26+5:302024-06-03T06:51:22+5:30
इस्लामाबाद हायकोर्टात काश्मिरी कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह यांच्या अपहरण प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
- डॉ. खुशालचंद बाहेती
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा परदेशी प्रदेश आहे आणि त्यावर पाकिस्तानचे कोणतेही अधिकार नाहीत, अशी कबुली स्वतः पाकिस्ताननेच इस्लामाबाद हायकोर्टासमोर दिली आहे.
इस्लामाबाद हायकोर्टात काश्मिरी कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह यांच्या अपहरण प्रकरणाची सुनावणी सुरू होती. रावळपिंडी येथील घरातून १५ मे रोजी त्यांचे अपहरण करण्यात आले हाेते. त्यांच्या पत्नीने हायकोर्टात पाक गुप्तचरांनी अपहरण केल्याचा दावा करत हॅबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. पाकिस्तानचे अतिरिक्त ॲटर्नी जनरल यांनी सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती कयानी यांच्यासमोर युक्तिवाद केला की, फरहाद शाह पीओके पोलिसांच्या कोठडीत आहेत व त्यांना इस्लामाबाद हायकोर्टात हजर करता येणार नाही. कारण, काश्मीर हा एक परदेशी प्रदेश आहे.
न्यायमूर्ती कयानी यांनी प्रतिवाद केला की, जर पीओके हा परदेशी प्रदेश आहे तर पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी रेंजर्स तेथे कसे घुसतात ? तसेच लोकांचे अपहरण सुरूच ठेवल्याबद्दल न्यायमूर्ती कयानी यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांवर टीका केली.
कोण आहेत पत्रकार अहमद फरहाद?
न्यायालयाच्या युक्तिवादादरम्यान, अहमद फरहाद शाहला धिरकोट पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समोर आले. त्यांच्यावर पीओकेमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. अहमद फरहाद शाह पीओके आणि तेथील लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे व आंदोलन करणारे कार्यकर्ते आहेत. पाकिस्तानी लष्करावर जोरदार टीका करण्यासाठी ते ओळखले जातात.