'पोकेमॉन गो' गेमचा सर्व्हर क्रॅश झाल्याने संयमाचा बांध तुटला
By Admin | Published: July 17, 2016 01:10 PM2016-07-17T13:10:12+5:302016-07-17T13:10:12+5:30
सध्या जगभरात धुमाकूळ घालणा-या पोकेमॉन गो या गेमचा सर्व्हर शनिवारी डाऊन झाल्याने अमेरिका, युरोपमध्ये अनेकांचा संयमाचा बांध सुटला.
ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. १७ - सध्या जगभरात धुमाकूळ घालणा-या पोकेमॉन गो या गेमचा सर्व्हर शनिवारी डाऊन झाल्याने अमेरिका, युरोपमध्ये अनेकांचा संयमाचा बांध सुटला. प्रयत्न करुनही मोबाईलमध्ये गेम डाऊनलोड होत नसल्याने अनेकांनी सोशल मिडियावरुन संताप व्यक्त केला. हॅकींग ग्रुपने या सर्व्हर डाऊनची जबाबदारी घेतली आहे. आठवड्यापूर्वी आलेल्या पोकेमॉन गो या ऑगमेंटेड रिएलिटी गेमने अनेकांना वेड लावलं आहे.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिकेमध्ये हा गेम लॉंच करण्यात आला. पण आठवडयाभरातच हा गेम इतक्या मोठया प्रमाणावर डाऊनलोड झाला की, त्यामुळे सर्व्हर क्रॅश होत आहे. अजूनही जगातील अनेक देशांमध्ये अधिकृतरित्या हा गेम डाऊनलोड करता येत नाही. पोकेमॉन गो हा गेम म्हणजे ऑगमेंटेड रिअॅलिटी म्हणजेच एक प्रकारे आभासी विश्व आणि वास्तव जग यांचा मेळ घडवून आणणारी नवीन संकल्पना.
आणखी वाचा
स्मार्टफोनमुळे मोबाइल अॅप्लिकेशन आणि गेममध्ये अडकून राहिल्याने घराबाहेर न पडणारी मंडळी पोकेमॉन गो गेमच्या वेडापायी अख्खं शहर पिंजून काढत आहेत आणि नवीन लोकांना भेटत आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित नीअँटिक या गेमिंग कंपनीने लहान मुलांच्या विश्वातील लोकप्रिय कार्टून मालिकेतील पोकेमॉन या कार्टून कॅरेक्टरला केंद्रस्थानी ठेवून हा गेम तयार केला आहे. हा गेम खेळण्यासाठी आपल्या मोबाइलमधील जीपीएस या तंत्राचा वापर अनिवार्य आहे. जीपीएस यंत्रणा चालू करून हा गेम खेळण्यास सुरुवात करण्यासाठी वापरात असलेला मोबाइल हा हातात घेऊन तुम्हाला प्रत्यक्ष स्वत:हून वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करावी लागते.
ही भटकंती चालू असताना तुम्ही प्रत्यक्ष जगात म्हणजेच तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी सध्या कुठे आहात हे या गेममध्ये तपासले जाते आणि हा गेम खेळताना तुमच्या मोबाइलवर ते तुम्हाला जीपीएसच्या माध्यमातून नकाशावर दाखवले जाते. आत्ता हा गेम तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच्या आसपास आभासी जगतात तुमच्या मोबाइलवरील नकाशात त्या ठिकाणी पोकेमॉन कुठे लपले आहेत ते तुम्हाला दाखवते; आणि तुम्हाला त्या पोकेमॉनला पोकबॉल या एक चेंडूप्रमाणे दिसणाऱ्या गोष्टीला पोकेमॉनकडे फेकून पोकेमॉनला तुमच्या जाळ्यात पकडावे लागते. या गेमची संरचना अशा प्रकारे केली असल्याने हा गेम एका ठिकाणी किंवा एका विशिष्ट जागेच्या परिघात बसून खेळणे अशक्य आहे.