अमेरिकेकडून PoKचा "आझाद काश्मीर" म्हणून उल्लेख, भारताने नोंदवला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 10:10 AM2017-07-22T10:10:44+5:302017-07-22T10:10:44+5:30
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने आपल्या दहशतवादी अहवालात पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा "आझाद जम्मू काश्मीर" असा उल्लेख केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने आपल्या दहशतवादी अहवालात पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा "आझाद जम्मू काश्मीर" असा उल्लेख केला आहे. सोबतच भारताला टार्गेट करण्यासाठी दहशतवादी या भागाचा वापर करतात असंही या अहवालातून सांगण्यात आलं आहे. "कन्ट्री रिपोर्ट ऑन टेररिझम 2016" नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारताने याप्रकरणी अमेरिकेकडे आपला निषेध नोंदवला आहे.
आणखी बातम्या
अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीय सरकारने अमेरिकेतील अधिका-यांशी संवाद साधला. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, "अमेरिका स्टेट डिपार्टमेंटच्या दहशतवादी अहवालात "आझाद जम्मू आणि काश्मीर" असा उल्लेख असल्याचं सरकारच्या लक्षात आलं. आम्ही अमेरिकेतील अधिका-यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला असून आपला निषेध नोंदवला आहे".
पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा अमेरिकेने "आझाद जम्मू आणि काश्मीर" असा उल्लेख करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने वारंवार निषेध नोंदवूनही हा संपुर्ण परिसर पाकिस्तान लष्कराकडून वापरला जातो. या अहवालात भारत दहशतवादाविरोधात लढण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नाचं कौतुकही करण्यात आलं आहे.
तसं दुस-या बाजूने पाहायला गेल्यास भारतासाठी ही जरा दिलासा देणारी गोष्टदेखील आहे. कारण अहवालात त्यांनी ‘भारत प्रशासित काश्मीर’ऐवजी जम्मू काश्मीर असा स्पष्ट उल्लेख केला आहे. 26 जून रोजी हिजबुल मुजाहिद्दिनचा म्होरक्या, दहशतवादी सईद सल्लाउद्दिनला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करताना अमेरिकेने आपल्या आदेशात ‘भारत प्रशासित काश्मीर’ असा धक्कादायक उल्लेख केला होता.
अहवालात हाफिज सईद आणि त्याची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचाही उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिज सईदबद्दल अहवालात सांगण्यात आलं आहे की, "लष्कर-ए-तोयबा नेमकी किती विस्तारली आहे याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र आझाद जम्मू काश्मीर, पाकिस्तानमधील पंजाब, खैबर-पख्तुन्वा, पाकिस्तानमधील पंजाब प्रांत आणि भारतामधील जम्मू काश्मीरमध्ये त्यांचे हजारो सदस्य आहेत.
अमेरिकेने एखाद्या भागाचा उल्लेख करताना तो योग्य प्रकारे करावा असं संरक्षण विभागाशी संबंधित अधिका-यांचं म्हणणं आहे. "पाकिस्तान सरकार, त्यांचं लष्कर आणि हिजबूल, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्महसारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा आझाद जम्मू काश्मीर असा उल्लेख करत असतात", अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे. या अहवालात पाकिस्तानने दहशतवादाविरोधात ठोस कारवाई न केल्याबद्दल ताशेरेही ओढण्यात आले आहेत.