ब्रसेल्स हल्ल्याप्रकरणी पोलिसांचं धाडसत्र, 6 जणांना अटक
By admin | Published: March 25, 2016 08:02 AM2016-03-25T08:02:53+5:302016-03-25T08:13:55+5:30
दहशतवादी हल्ला प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुरुवारी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवाही हल्ल्याच्या दोन दिवसानंतर ही अटक करण्यात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
ब्रसेल्स, दि. २५ - दहशतवादी हल्ला प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुरुवारी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवाही हल्ल्याच्या दोन दिवसानंतर ही अटक करण्यात आली आहे. फेडरल प्रॉसिक्युटर कार्यालयाने ही माहिती दिली आहे. 3 संशयितांची चौकशी तर सिटी सेंटरमधील फेडरल प्रॉसिक्युटर कार्यालयाबाहेरच करण्यात आली आहे.
दोन जणांना शहरातूनच अटक करण्यात आली आहे तर सहाव्या व्यक्तीला जेट्टे येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती फेडरल प्रॉसिक्युटर कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. प्रवक्त्यांनी अजून माहिती देण्यास नकार दिला आहे. अटक करण्यात आलेल्यांविरोधात गुन्हे दाखल करायचे की नाही याचा निर्णय शुक्रवारी घेतला जाणार आहे.
विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख पटवण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांचा मोठ्या प्रमाणात तपास सुरु आहे. दहशतवादी हल्ला करण्याआधी मंगळवारी दहशतवादी स्फोटकांनी भरलेल्या तीन सुटकेस घेऊन निघाले होते. हे दहशतवादी ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणीदेखील पोलिसांनी छापा टाकला आहे. मात्र तेथून कोणाला अटक करण्यात आलेलं नाही.
ब्रुसेल्स येथे विमानतळावर आणि त्यापाठोपाठ मेट्रो स्टेशनवर मंगळवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ३४ ठार तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास जेवेन्तम विमानतळाच्या मुख्य कक्षात दोन स्फोट झाले. त्यानंतर काही वेळातच युरोपीय संघाच्या मुख्य इमारतीजवळ मालबिक मेट्रो स्टेशनवर तिसरा स्फोट झाला. कार्यालयीन वेळ असल्याने मेट्रो स्टेशनवर मोठी गर्दी होती. तर विमानतळावरही चेक इन करण्यासाठी हजारो प्रवासी प्रतीक्षेत होते.