पोलिसांनी धाड टाकताच बॉम्बस्फोट, १० जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2016 03:28 AM2016-01-23T03:28:14+5:302016-01-23T03:28:14+5:30
इजिप्तमध्ये पोलिसांनी अपार्टमेंटवर धाड टाकल्यानंतर इस्लामिक स्टेटशी (इसिस) संबंधित अतिरेक्यांनी तेथे बॉम्बस्फोट घडवून आणले. या हल्ल्यात सात पोलिसांसह दहा ठार, तर २० जण जखमी झाले.
कैरो : इजिप्तमध्ये पोलिसांनी अपार्टमेंटवर धाड टाकल्यानंतर इस्लामिक स्टेटशी (इसिस) संबंधित अतिरेक्यांनी तेथे बॉम्बस्फोट घडवून आणले. या हल्ल्यात सात पोलिसांसह दहा ठार, तर २० जण जखमी झाले.
अल-हराम जिल्ह्यातील प्रसिद्ध गीझा पिरॅमिडस्जवळ गुरुवारी हा बॉम्बस्फोट झाला. दहशतवाद्यांनी एका सदनिकेला अड्डा बनविल्याच्या संशयामुळे पोलिसांनी तेथे धाड टाकली होती. इसिसशी संलग्नित इजिप्शियन दहशतवादी संघटना अन्सार बैत अल मकदेसने शुक्रवारी या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. सिनाई येथील या संघटनेने आपल्या वेबसाईटवर तसे निवेदन पोस्ट केले आहे. आपणच टीप देऊन पोलिसांना बॉम्ब पेरून ठेवलेल्या सदनिकेत घेऊन आलो होतो. पोलीस सदनिकेत येताच बॉम्बस्फोट झाले, असे या संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे. तथापि, गृहमंत्रालयाने स्फोटामागे बडतर्फ राष्ट्राध्यक्ष मोहंमद मुर्सी यांच्या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा हात असल्याचे सांगितले. मुस्लिम ब्रदरहुडचा एक गट बॉम्ब बनविण्यासाठी या सदनिकेचा वापर करीत होता, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. लष्कराने मुर्सी यांना राष्ट्राध्यक्षपदावरून खाली खेचल्यापासून अल-हरामने अनेक हल्ले घडवून आणले आहेत. मुर्सींच्या बडतर्फीपासून दहशतवादी सातत्याने पोलीस कर्मचारी आणि सैनिकांवर हल्ले करीत आहेत. (वृत्तसंस्था)