गेट तोडून पोलिस शिरले इम्रान खान यांच्या घरात, ६१ कार्यकर्त्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 09:29 AM2023-03-19T09:29:11+5:302023-03-19T09:29:25+5:30
६१ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, पेट्रोल बॉम्बसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लाहोर येथील घरात शनिवारी अखेर पोलिसांनी प्रवेश केला. पंजाब पोलिसांच्या दहा हजारांपेक्षा अधिक सशस्त्र पोलिसांनी ही कारवाई करताना इम्रान खान यांच्या घराचे मेन गेट बुलडोजर लावून तोडले. यावेळी ६१ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, पेट्रोल बॉम्बसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, इम्रान खान हे तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयात हजर राहण्यासाठी इस्लामाबादला रवाना होताच पोलिसांनी लाहोरमधील त्यांच्या ‘झमन पार्क’ निवासस्थानास घेराव घातला. विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई करण्यात आली तेव्हा त्यांची पत्नी निवासस्थानी होती, असे ट्वीट इम्रान खान यांनी केले.
भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयात हजर न झाल्यामुळे त्यांना अटक करण्याचा प्रयत्न पोलिस गेल्या काही दिवसांपासून करीत होते. तथापि, त्यांच्या हजारो समर्थकांनी पोलिसांना रोखून धरले होते. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अश्रुधुराचा वापर केला होता. तरीही कार्यकर्ते हटले नव्हते. (वृत्तसंस्था)