CoronaVirus: मुस्लिम धर्मगुरूच्या अंत्ययात्रेला गर्दी जमली; पोलिसाची नोकरी गेली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 01:19 AM2020-04-20T01:19:57+5:302020-04-20T01:21:42+5:30
वरिष्ठ मुस्लिम धर्मगुरूच्या अंत्ययात्रेसाठी लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करून एकत्र आले
ढाका : देशभर लॉकडाऊन लागू असतानाही अंत्यविधीसाठी हजारो लोक एकत्र येऊ न देण्यात अपयशी ठरल्याबद्दल शाहदात हुस्सेन टिटू या पोलीस अधिकाऱ्याला पदावरून दूर केले गेले. वरिष्ठ मुस्लिम धर्मगुरूच्या अंत्ययात्रेसाठी लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करून एकत्र आले होते. टिटू हे ब्राह्मणबारियातील सरैल पोलीस ठाण्याचे प्रभारी होते. त्यांनी अंत्यसंस्कारांच्या प्रार्थनेसाठी लोकांना एकत्र येऊ दिल्याबद्दल त्यांना पदावरून दूर करण्यात आल्याचे पोलीस मुख्यालयाने शनिवारी निवेदनात म्हटले.
लोक एकत्र येणार नाहीत यासाठी टिटू यांनी योग्य ती पावले उचलली नाहीत. हे त्यांच्यावरील कारवाईचे कारण असल्याचे बांगलादेश न्यूज २४ डॉट कॉमने म्हटले. मौलाना जुबेर अहमद अन्सारी (५५) यांच्या अंत्ययात्रेला शनिवारी हजारो लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करून एकत्र आले होते.
देशात कोविड-१९ चे २,१४४ रुग्ण असून, ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अंत्ययात्रेसाठी प्रचंड संख्येने जमलेल्या गर्दीवर देशात अनेक भागांत समाजमाध्यमांतून जोरदार टीका झाली होती.
———————-