पोलिसांच्या गोळीबारात २ मधेशी निदर्शक ठार
By admin | Published: November 22, 2015 11:53 PM2015-11-22T23:53:24+5:302015-11-22T23:53:24+5:30
दक्षिण नेपाळमधील एका प्रमुख महामार्गावर मधेशी आंदोलकांनी केलेली नाकेबंदी सक्तीने उठविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान २ जण ठार आणि अन्य कित्येक जण जखमी झाले.
काठमांडू : दक्षिण नेपाळमधील एका प्रमुख महामार्गावर मधेशी आंदोलकांनी केलेली नाकेबंदी सक्तीने उठविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान २ जण ठार आणि अन्य कित्येक जण जखमी झाले.
नेपाळमध्ये नवीन धर्मनिरपेक्ष घटना लागू झाल्यापासून मधेशी निदर्शकांनी दक्षिण नेपाळमध्ये भारतीय सीमेवर आंदोलन सुरू करून नाकेबंदी केली आहे. त्यामुळे भारतातून नेपाळला जीवनावश्यक वस्तंूचा आणि औषधींचा पुरवठा थांबला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ही परिस्थिती आहे.
शनिवारी उशिरा रात्री सपतारी जिल्ह्यातील पूर्व-पश्चिम राजमार्गावर नाकेबंदी करणाऱ्या ‘युनायटेड डेमोक्रॅटिक मधेशी फ्रंटच्या’ कार्यकर्त्यांना हटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तेव्हा या निदर्शकांनी त्यांच्यावर पेट्रोल बॉम्ब आणि दगड-विटांनी हल्ला केला. त्यामुळे गोळीबार करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले. आता या मार्गावरून वाहनांची सुरक्षित वाहतूक व्हावी म्हणून तेथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पोलिसांचा गोळीबार आणि निदर्शकांची दगडफेक यात किमान १७ निदर्शक आणि २५ पोलीस जखमी झाले. पाच निदर्शक आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. जवळपास २,५०० निदर्शकांनी पोलिसांवर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.