ट्रम्प टॉवरला पोलिसांनी घेरले; पॉर्न स्टार प्रकरणात अटक टाळण्यासाठी ट्रम्प सरेंडर करण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 10:24 AM2023-04-03T10:24:36+5:302023-04-03T10:24:57+5:30
ट्रम्प येण्यापूर्वी न्यायालयासमोर त्यांचे समर्थक आंदोलन करू शकतात अशी शक्यता आहे. रिपब्लिकन खासदार मार्जोरी टेलर ग्रीनसह ट्रम्पच्या अनेक समर्थकांनी न्यूयॉर्कला कूच करण्यास सुरुवात केली आहे.
पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनिअल्सला पैसे दिल्यावरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अडचणीत आले आहेत. या प्रकरणात अटकेपासून वाचण्यासाठी ते सरेंडर करण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्क शहराच्या पोलिसांनी ट्रम्प टॉवरला चारही बाजुंनी गेरले असून मेटल बॅरिअल लावले आहेत. व्हाईट हाऊस सोडताना ट्रम्प समर्थकांनी घातलेला धुडगुस पाहता तिथे काहीही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मॅनहॅटन क्रिमिनल कोर्टहाऊसजवळून जाणारे पाच रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत. ट्रम्प येण्यापूर्वी न्यायालयासमोर त्यांचे समर्थक आंदोलन करू शकतात अशी शक्यता आहे. रिपब्लिकन खासदार मार्जोरी टेलर ग्रीनसह ट्रम्पच्या अनेक समर्थकांनी न्यूयॉर्कला कूच करण्यास सुरुवात केली आहे.
मार्जोरी या ट्रम्प यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. न्यूयॉर्क यंग रिपब्लिकन क्लबही ट्रम्प यांच्यावर होत असलेल्या कारवाईचा निषेध करणार आहे. क्लबचे सदस्य कोर्टहाऊसपासून रस्त्यावरील एका पार्कमध्ये निषेधाचे नियोजन करत आहेत.
ट्रम्प येण्यापूर्वी कोर्ट काही काळासाठी बंद केले जाणार आहे. ट्रम्प सध्या फ्लोरिडामध्ये आहेत. फ्लोरिडाहून ते सोमवारी न्यूयॉर्कला पोहोचू शकतात, रात्री घरीच थांबून ते मंगळवारी कोर्टात हजर होऊ शकतात असे त्यांच्या सल्लागाराने म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वीचे हे प्रकरण आहे. पॉर्न स्टारला अफेअरबाबत तिचे तोंड बंद करण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यासाठी त्यांनी १,३०,००० डॉलर दिल्याचा आरोप आहे.
नेवाडा येथे एका सेलिब्रिटी गोल्फ स्पर्धेदरम्यान ट्रम्पने तिला आपल्या हॉटेलच्या खोलीत बोलावले आणि टीव्ही स्टार बनवण्याचे वचन दिले होते, आपली फसवणूक केल्याचा आरोप पॉर्न स्टार स्टॉर्मीने केला आहे.