पाकिस्तानात पोलिसांच्या ट्रकखाली बॉम्बस्फोट, सात पोलिसांचा मृत्यू, तर 22 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 12:52 PM2017-10-18T12:52:23+5:302017-10-18T13:10:40+5:30
पोलिसांच्या ट्रकला लक्ष्य करत करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात सात पोलिसांचा मृत्यू झाला असून, 22 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे हा बॉम्बस्फोट झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इस्लामाबाद - पोलिसांच्या ट्रकला लक्ष्य करत करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात सात पोलिसांचा मृत्यू झाला असून, 22 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे हा बॉम्बस्फोट झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 35 पोलीस कर्मचा-यांना घेऊन ट्रक जात होता. ट्रक क्वेट्टा - सिब्बी रोडवरील सारीब मिल परिसरात पोहोचला असता बरोबर त्याचवेळी रस्त्याशेजारी असणारा बॉम्ब फुटला अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. बॉम्बस्फोट नेमक्या कोणत्या प्रकारचा होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सिव्हिल हॉस्पिटलचे वसीम बेग यांनी सात जणांचा मृत्यू झाला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून सध्या रुग्णालयात आणीबाणीची परिस्थिती आहे असं वृत्त डॉनने दिलं आहे.
बलुचिस्तानचे गृहमंत्री सरफराज बुगती यांनी हल्ल्याचा निषेध केला असून, मृतांच्या आकड्याला दुजोरा दिला आहे. 'दहशतवादाविरोधातील लढाई अद्याप संपलेली नाही. या लढाईत बलुचिस्तान पहिल्या क्रमांकावर असून, जोपर्यंत सगळे दहशतवादी मारले जात नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही', असं सरफराज बुगती बोलले आहेत. 'अशाप्रकारच्या भ्याड हल्ल्यांमुळे आमचे सुरक्षा जवान कर्तव्यापासून मागे हटणार नाहीत', असंही सरफराज बुगती यांनी सांगितलं. सुरक्षा जवानांनी संपुर्ण परिसरात नाकेबंदी केली असून, कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.