महिलांना किस करताना बघून पोलीस भडकले, केली अटक; होऊ शकते जन्मठेप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:38 IST2026-02-27T16:36:53+5:302026-02-27T16:38:26+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित २१ आणि २२ वर्षीय दोन तरुणी सार्वजनिक ठिकाणी एकमेकींचे चुंबन घेताना आढळून आल्या. त्यांना अटक करण्यात आली आहे.

महिलांना किस करताना बघून पोलीस भडकले, केली अटक; होऊ शकते जन्मठेप!
जगातील अनेक देशांमध्ये समलैंगिकता ही गंभीर गुन्ह्यांच्या श्रेणीत येते. युगांडा हा त्यापैकीच एक. येथील अरुआ शहरात दोन तरुणींना सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणे महागात पडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित २१ आणि २२ वर्षीय दोन तरुणी सार्वजनिक ठिकाणी एकमेकींचे चुंबन घेताना आढळून आल्या. त्यांना अटक करण्यात आली आहे.
पाश्चात्य देशांचा तीव्र विरोध असूनही... -
युगांडा सरकारने २०२३ मध्ये अत्यंत कठोर 'अँटी होमोसेक्सुएलिटी ॲक्ट' लागू केला आहे. पाश्चात्य देशांचा तीव्र विरोध असूनही, येथील सरकार एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाविरोधात कठोर कायदे राबवत आहे. या कायद्यानुसार, समलैंगिक संबंधांसाठी जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तसेच, काही गंभीर प्रकरणांमध्ये मृत्युदंडाचीही तरतूद आहे.
...तर फाशीची शिक्षाही होऊ शकते -
या कायद्यानुसार, एखादी व्यक्ती वारंवार समलैंगिक संबंधांत आढळल्यास किंवा अल्पवयीन, वृद्ध व दिव्यांग व्यक्तींसोबत असे संबंध ठेवल्यास तिला फाशीची शिक्षाही होऊ शकते. युगांडा हा प्रामुख्याने ख्रिश्चन बहुल आणि रूढिवादी देश असल्याने या कायद्याला स्थानिक पाठिंबा असला, तरी मानवाधिकार संघटना आणि संयुक्त राष्ट्रांनी याचा निषेध केला आहे.
विशेष म्हणजे, या कायद्यामुळे जागतिक बँकेने युगांडाला मिळणारी आर्थिक मदत रोखली होती. जी २०२५ च्या मध्यात पुन्हा सुरू करण्यात आली. नुकतेच, एका न्यायालयाने 'गंभीर समलैंगिकता' श्रेणीतील पहिल्या आरोपीचा खटला, त्याच्या ढासळलेल्या मानसिक स्थितीमुळे फेटाळून लावला आहे.