अमेरिकेत कृष्णवर्णीयाची हत्या; वाहतूक नियम मोडल्यामुळे पोलिसांनी झाडल्या 60 गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 04:22 PM2022-07-04T16:22:48+5:302022-07-04T16:59:28+5:30
अमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 27 जून रोजी अमेरिकेच्या ओहायोमधील अक्रोन शहरात पोलिसांनी एका कृष्णवर्णीय व्यक्तीवर 60 गोळ्या झाडल्या.
कोलंबस: अमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 27 जून रोजी अमेरिकेच्या ओहायोमधील अक्रोन शहरात पोलिसांनी एका कृष्णवर्णीय व्यक्तीवर 60 गोळ्या झाडल्या. झेलँड वॉकर असे मृताचे नाव आहे. तो वाहतुकीचे नियम पाळत नव्हता. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, तो पळून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
झेलँडकडे कोणतीही शस्त्रे नव्हती...
द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, अक्रोन पोलिस प्रमुख म्हणाले, झेलँड वॉकर वाहतुकीचे नियम पाळत नव्हता, यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला कारमधून बाहेर येण्यास सांगितले. पण, तो आला नाही, नंतर पोलिसांनी त्याला बाहेर काढले असता, तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करत, त्याच्यावर 60 गोळ्या झाडल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
अनेक राज्यांमध्ये निदर्शने सुरू
या घटनेच्या विरोधात अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये लोक निदर्शने करत आहेत. हातात 'जस्टिस फॉर झेलँड' आणि 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' असे बॅनर घेऊन लोक या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत आहेत.
जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येनंतर अमेरिकेत हिंसक निदर्शने
यापूर्वी 25 मे 2020 रोजी मिनियापोलिस पोलिसांच्या पथकाने जॉर्ज फ्लॉयड नावाच्या कृष्णवर्णीयाची हत्या केली होती. पोलिसांनी त्याला घेरले आणि जमिनीवर झोपवले. यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने त्याचा गुडघा जॉर्जच्या मानेवर 8 मिनिटे दाबून ठेवला. यात श्वार गुदमरुन त्याचा मृत्यू झाला. यानंतर व्हाईट हाऊस ते कॅपिटल हिल्स, सर्वत्र हिंसाचार झाला. सर्वांनी या हत्येचा तीव्र निषेध केला.