पोलिओ रुग्ण सापडला अन् गाझा हादरले! आत्तापर्यंत ६,४०,००० मुलांना पोलिओची लस देण्यात आली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 07:01 AM2024-09-16T07:01:28+5:302024-09-16T07:02:36+5:30

छोट्याशा अब्दुलचं हसणं-खेळणं त्या तंबूतल्या सगळ्यांनाच आनंदून टाकायचं. इस्त्रायलयच्या हल्ल्यांना घाबरून लाखो  पॅलेस्टिनी लोकांना जीव वाचविण्यासाठी आपल्या घरातून बाहेर पडून विस्थापित व्हावं लागलं.

Polio patient found and Gaza shook So far 640,000 children have been vaccinated against polio | पोलिओ रुग्ण सापडला अन् गाझा हादरले! आत्तापर्यंत ६,४०,००० मुलांना पोलिओची लस देण्यात आली

पोलिओ रुग्ण सापडला अन् गाझा हादरले! आत्तापर्यंत ६,४०,००० मुलांना पोलिओची लस देण्यात आली

ही गोष्ट आहे युद्धग्रस्त देशामधल्या एका १ वर्षाच्या मुलाची. अब्दुल रहमानची. एक छोटीशी खोली. खोली म्हणजे तात्पुरत्या आसऱ्यासाठी टाकलेला एक तंबू. तंबूच्या आत जमिनीवर  एक फाटकी चटई अंथरलेली. बाजूला स्वयंपाकाची भांडी ठेवलेली. घराच्या आत दारिद्र्य पसरलेलं आणि घराबाहेर मृत्यू नेम धरून बसलेला.  अशा वातावरणात छोट्याशा अब्दुलचं हसणं-खेळणं त्या तंबूतल्या सगळ्यांनाच आनंदून टाकायचं. इस्त्रायलयच्या हल्ल्यांना घाबरून लाखो  पॅलेस्टिनी लोकांना जीव वाचविण्यासाठी आपल्या घरातून बाहेर पडून विस्थापित व्हावं लागलं.

दोन दिवसांत केजरीवाल सोडणार मुख्यमंत्रिपद; नवी खेळी : म्हणाले, जनतेने प्रमाणपत्र दिल्यावरच पदावर परतणार

आतापर्यंत जीव वाचवण्यात यशस्वी झालेल्या लोकांच्या जगण्याची, मात्र परवड झाली. जगण्याचं भीषण रूप अनुभवत लोक लपत-छपत एकमेकांच्या आधाराने, एकमेकांकडून उमेद घेत जगत आहेत.  नऊ मुलांची आई असलेल्या ३५ वर्षांच्या नेवीन अबू अल जिदयानला ही उमेद तिचा एक वर्षाचा अब्दुल देत होता. पण, आता नेविन दिवस-रात्र एका जागी पडून असलेल्या अब्दुलच्या  शेजारी बसलेली असते. दिवस-रात्र रडत असते. अब्दुलला चांगल्या उपचारांची गरज असताना, दिवसेंदिवस त्याची परिस्थिती आणखीनच बिघडत चालल्याचं पाहून ती हवालदिल झाली आहे. .

दोन महिन्यांपूर्वी अब्दुलला सणसणीत ताप आला. त्याला उलट्या होऊ लागल्या. नेविन अब्दुलला घेऊन अल अक्सा मार्टीयर या दवाखान्यात पोहोचली. इस्त्रायलच्या हल्ल्यात गाझातील आरोग्य यंत्रणेची वाताहात झाली. केवळ एवढाच एक दवाखाना जखमींवर, आजाऱ्यांवर उपचार करू शकत होता. दोन आठवडे  अब्दुलवर त्या दवाखान्यात उपचार सुरू होते. एरवी झोप नकोच म्हणणारा अब्दुल दवाखान्यात असताना क्वचितच डोळे उघडायचा. दूध पिण्याचीही त्याच्यात ताकद नसायची.

दोन आठवड्यांनी नेविन अब्दुलला घेऊन घरी परतली. औषधांनी अब्दुल परत पहिल्यासारखा होईल, असं नेविनला वाटत होतं. पण, औषधोपचारांनीही परिस्थिती सुधारत नसल्याने डाॅक्टरांना अब्दुलचं आजारापण गंभीर असल्याची शंका आली. त्यांनी अब्दुलच्या रक्ताचे नमुने जाॅर्डनला तपासणीसाठी पाठवले. एक महिन्यानंतर तपासणीचे अहवाल डाॅक्टरांना मिळाले. त्यांनी फोन करून नेविनला सांगितले की, अब्दुलला पोलिओ झालाय. अब्दुलला पोलिओमुळे आता कधीही चालता येणार नाही, जागेवरून हलता येणार नाही, हे समजल्यावर नेविन कोलमडून पडली. ती स्तब्ध झाली. गेल्या २५ वर्षांत गाझातील पोलिओचा हा पहिला रुग्ण आहे. युद्धामुळे झालेला हा परिणाम आहे. पोलिओचा पहिला रुग्ण येथे सापडला, पण त्यामुळे अख्खी आरोग्य यंत्रणाच हादरली आहे. आता इथे आणखी नवीन काय वाढून ठेवलं आहे, या विचारानं सारेच त्रस्त झाले आहेत.

नेविन आणि तिचं कुटुंब उत्तर गाझामध्ये राहायचं, पण इस्त्रायलचे हल्ले सुरू झाल्यावर  तिला आपलं घर सोडून मुला-बाळांसह विस्थापित व्हावं लागलं, तेव्हा अब्दुल फक्त एक महिन्याचा होता. ११  महिन्यांत आतापर्यंत नेविनने तिच्या कुटुंबासह पाच वेळा स्थलांतर केलं आहे. विस्थापनामुळे आणि मृत्यूच्या दहशतीखाली वावरताना अब्दुलला अत्यावश्यक असलेल्या लसी देणं राहूनच गेलं. दारिद्र्य आणि अभावाचं जगणं, दूषित पाणी आणि पोषक अन्नाचा अभाव या सगळ्यामुळेच अब्दुल आजारी पडला आणि त्याला पोलिओ झाला याची जाण नेविनला आहे.

अब्दुलला गाझाबाहेर जाऊन उपचार मिळाले, तर तो बरा होईल, असा तिला आणि तिच्या नवऱ्याला विश्वास वाटतोय. पण, सध्या तरी त्यांना आहे त्या परिस्थितीतच दिवस काढावे लागताहेत. अब्दुलची परिस्थिती मात्र दिवसेंदिवस बिघडत चाललीये. आधी खेळकर असलेला अब्दुल चटईवर पडून असतो. कधीकधी खूप रडतो. रडता-रडता त्याला आकडी येते. कधीतरी त्याला झोप लागते. झोपही शांत लागत नाही. पोलिओ झालेला अब्दुल खेळणं विसरला आहे आणि निस्तेज झालेल्या आपल्या मुलाकडे बघून नेविन जगणं विसरत चालली आहे. आजारी अब्दुलला पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची गरज आहे, पण अकरा जणांच्या कुटुंबासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची बाटली विकत घेणं नेविनला न परवडणारी गोष्ट आहे.

साडेसहा लाख मुलांना पोलिओची लस

अब्दुलला पोलिओची लागण झाली ही बाब गाझामधील आरोग्य यंत्रणेने अतिशय गांभीर्याने घेतली आहे. २५ वर्षांनंतर गाझामध्ये पोलिओचा पहिला रुग्ण आढळला आहे. पोलिओचा विषाणू इतर मुलांमध्ये पसरू नये, म्हणून युनायटेड नेशन्स आणि गाझामधील आरोग्य यंत्रणेने त्वरित पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. आत्तापर्यंत ६,४०,००० मुलांना पोलिओची लस देण्यात आली आहे. सध्या गाझात असलेला पोलिओ विषाणू हा लसीतूनच उत्पन्न झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Web Title: Polio patient found and Gaza shook So far 640,000 children have been vaccinated against polio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.