नेपाळच्या पंतप्रधानांचे राजकीय भवितव्य आज ठरणार? स्थायी समितीची होणार बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 04:24 AM2020-07-10T04:24:41+5:302020-07-10T07:20:23+5:30
क्षाच्या ४५ सदस्यांच्या महत्त्वाच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पक्षातील तणाव खूपच वाढल्यामुळे ओली आणि प्रचंड यांना मतभेद मिटविण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही बैठक चौथ्यांदा लांबणीवर टाकली गेली होती.
काठमांडू : नेपाळच्या सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षातील (एनसीपी) मतभेद आठवड्यात अर्धा डझन बैठका घेतल्यानंतरही मिटलेले नाहीत. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पुष्प कमल दहाल ‘प्रचंड’ यांच्यातील मतभेद सहा बैठकांनंतरही दूर झालेले नाहीत, असे गुरुवारी प्रसारमाध्यमांनी म्हटले.
पक्षाच्या ४५ सदस्यांच्या महत्त्वाच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पक्षातील तणाव खूपच वाढल्यामुळे ओली आणि प्रचंड यांना मतभेद मिटविण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही बैठक चौथ्यांदा लांबणीवर टाकली गेली होती. चीनचे नेपाळमधील राजदूत हौवू यांकी यांनी ओली यांचे पद वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यामुळे आता ओली यांचे राजकीय भवितव्य स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत ठरेल.
प्रचंड यांच्या गटाला वरिष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाल आणि झालानाथ खनाल यांचा पाठिंबा आहे. प्रचंड यांनी ओली यांनी नुकतीच भारतविरोधात केलेली वक्तव्ये ही ना राजकीदृष्ट्या योग्य होती ना राजनैतिकदृष्ट्या उचित, असे म्हणून त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे, अशी मागणी केलेली आहे.
दोन गटांतील मतभेद वाढले
नेपाळ कम्युनिस्ट पक्षात ओली आणि प्रचंड यांच्या गटात सत्ता वाटपावरून मतभेद आहेत. ओली यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतर्फीच समाप्त केले होते, तसेच कोविड-१९ महामारीचा प्रश्न सरकारने ढिसाळ पद्धतीने हाताळल्याबद्दल व पक्षाला वळसा घालून त्यांनी निर्णय घेण्यावरून ओली-प्रचंड गटांतील मतभेद आणखी तीव्र झाले आहेत.
ओली आणि प्रचंड यांनी हे मतभेद दूर करण्यासाठी बैठका घेतल्या; परंतु दोन्ही गटांनी दोन-दोन हात करायचेच, असे ठरवल्याचे दिसते, असे ‘द काठमांडू पोस्ट’ने वृत्त दिले.
ओली यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवारी देशात कुठे-कुठे निदर्शने झाली. रस्त्यांवर कोणालाही निदर्शने करण्यास सांगणार नाही, असा करार प्रचंड यांच्याशी ओली यांचा झालेला आहे, हे विशेष.