ब्रिटनमध्ये राजकीय उलथापालथ पण ऋषी सुनक कुठेयत? 15 दिवसांपासून गायब, ट्विटही सव्वा महिन्यापूर्वीचे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 08:43 AM2022-10-21T08:43:47+5:302022-10-21T08:44:10+5:30
पक्षाकडून पुढील नेता निवडला जाईपर्यंत ट्रस या पंतप्रधानपदी असणार आहेत. आता पुन्हा डिबेट शो व वेगवेगळे टप्पे सुरु होणार आहेत.
ब्रिटनमध्ये ५५ दिवसांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टप्प्यांनंतर लिझ ट्रस या पंतप्रधान झाल्या होत्या. परंतू, त्यांनीही ४४ दिवसांचा कारभार सांभाळून राजीनामा दिल्याने एकेकाळी जगावर राज्य करणाऱ्या या देशावर नेतृत्वाचे संकट ओढवले आहे. कालपर्यंत ट्रस या राजीनामा देण्यास नकार देत होत्या, परंतू सायंकाळी त्यांनी अखेर राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत भारतीयाचे नाव आले आहे.
पक्षाकडून पुढील नेता निवडला जाईपर्यंत ट्रस या पंतप्रधानपदी असणार आहेत. आता पुन्हा डिबेट शो व वेगवेगळे टप्पे सुरु होणार आहेत. ट्रस य़ांच्यावेळेस भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव पुढे होते. परंतू, ट्रस यांनी बाजी मारली होती. आता पुन्हा एकदा सुनक यांचे नाव येऊ लागले आहे.
माजी अर्थमंत्री क्वासी वारटेंग आणि जेरेमी हंट या दोघांनीही पक्षाच्या नव्या नेत्याच्या शर्यतीतून बाहेर असल्याचे घोषित केले आहे. यामुळे आता सर्वात मजबूत दावा भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा मानला जाऊ शकतो. ऋषी सुनक पुन्हा या शर्यतीत सामील होतील का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण 15 दिवसांपासून पक्ष आणि देशाच्या राजकारणात गोंधळ सुरू असताना सुनक शांत होते. माजी मंत्री मॉर्डंट हे देखील शर्यतीत सामील होऊ शकतात. लिझ निवडून येण्यापूर्वी खासदारांनी केलेल्या मतदानात सुनक यांना सर्वाधिक मते मिळाली होती. परंतू पक्षाने लिझ यांच्या पारड्याच पंतप्रधान पद टाकले आणि सुनक हरले.
यावेळी सुनक यांनी म्हटले होते, की लिझ जी निवडणूक आश्वासने देत आहे ती यूकेची अर्थव्यवस्था नष्ट करतील. पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांच्या मतदानात पराभूत झालेले ऋषी सुनक सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या वार्षिक बैठकीत उपस्थित राहण्यास सुनक यांनी नकार दिला आहे. सुनक यांनी जाहीर वक्तव्ये टाळली आहेत. शेवटचे ट्विट ८ सप्टेंबर रोजी केले होते.