पाकमध्ये आज मतदान, प्रचंड बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:12 AM2018-07-25T00:12:03+5:302018-07-25T06:36:20+5:30
देशात प्रथमच मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने लष्करी जवान तैनात केले गेले आहेत
इस्लामाबाद : पाकिस्तानात बुधवारी नवा पंतप्रधान निवडण्यासाठी व एक नागरी सरकार दुसऱ्या नागरी सरकारकडे सत्तेची सूत्रे सोपवण्यासाठी मतदान होत आहे. देशात प्रथमच मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने लष्करी जवान तैनात केले गेले आहेत.
पाकिस्तानच्या जन्मापासून नागरी सरकारकडून दुसऱ्या नागरी सरकारकडे सत्ता हस्तांतर होण्याची ही फक्त दुसरी वेळ असेल. या निवडणुकीत सर्वशक्तिमान लष्कर लबाडी करील, असे आरोप झाले असून कट्टर इस्लामी मोठ्या संख्येने सहभागी असल्याबद्दल काळजी व्यक्त झाली आहे.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल असेम्ब्लीच्या २७२ जागा ३,४५९ उमेदवार लढवत असून चार प्रांतीय असेम्ब्लींच्या ५७७ सर्वसाधारण जागा ८,३९६ उमेदवार लढवत आहेत. देशात १०५.९६ दशलक्ष मतदारांची नोंद आहे. देशभर मतदानासाठी तीन लाख ७० हजार लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. देशाच्या इतिहासात प्रथमच मतदानासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लष्कर तैनात केले गेले आहे.