कंगाल पाकचं भारताशी आता ‘फ्लॅग वॉर’!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 08:39 AM2023-08-10T08:39:52+5:302023-08-10T08:40:28+5:30
भारतीय लोकांसाठी तर तिरंग्याचं महत्त्व अपरंपार. हाच तिरंगा हाती घेऊन नंदुरबारच्या छोट्या शिरीषकुमारपासून तर मोठमोठ्या क्रांतिकारकांपर्यंत अनेकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं.
कोणत्याही देशासाठी आपल्या देशाचा ध्वज, आपला झेंडा म्हणजे जीव की प्राण. देशाचा ध्वज म्हणजे ते केवळ देशवासीयांच्या आत्मीयतेचं, अस्तित्वाचं प्रतीक नसतं, तर प्रत्येकासाठी ती प्रेरणा असते. देशाची शान असते, धगधगतं स्फुल्लिंग असतं. त्यामुळेच ऑलिम्पिकमध्ये आपापल्या देशाचा ध्वज फडकताना पाहिल्यावर मोठमोठ्या खेळाडूंच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा ओघळायला लागतात आणि आपल्या ध्वजापुढे ते नतमस्तक होतात.
भारतीय लोकांसाठी तर तिरंग्याचं महत्त्व अपरंपार. हाच तिरंगा हाती घेऊन नंदुरबारच्या छोट्या शिरीषकुमारपासून तर मोठमोठ्या क्रांतिकारकांपर्यंत अनेकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. शिरीषकुमारनंही हाती तिरंगा घेत, ‘वंदे मातरम’च्या जयघोषात, ब्रिटिशांच्या डोळ्याला डोळा भिडवून त्यांना आव्हान दिलं होतं. ब्रिटिशांनी त्याच्याकडून तिरंगा हिसकावण्याचा प्रयत्न केल्यावर त्यानं तो छतीशी कवटाळत प्राणपणानं जपला आणि त्यांना आव्हान दिलं, ‘हा मी इथे तुमच्यासमोर उभा आहे, भले तुम्ही माझ्यावर गोळ्या झाडा, पण माझ्या तिरंग्याचा अपमान मी होऊ देणार नाही.’ एवढासा १५ वर्षांचा चिमुरडा आपल्याला आव्हान देतोय म्हटल्यावर ब्रिटिशांचा तीळपापड झाला आणि त्यांनी खरोखरच छोट्या शिरीषकुमारवर गोळ्या झाडल्या. शिरीषकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडला, पण आपल्या हातातला तिरंगा त्यानं खाली पडू दिला नाही. देशवासीयांसाठी आपल्या देशाच्या ध्वजाचं, झेंड्याचं महत्त्व इतकं मोठं आहे.
आता येऊ घातलेल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा आणि आपल्या क्रांतिकारकांची पुन्हा एकदा आठवण काढली जाईल. पण त्याआधीच आपला तिरंगा आता चर्चेत आला आहे. त्याचं कारण पुन्हा पाकिस्तानच आहे. भिकेचे डोहाळे लागलेला पाकिस्तान आता आपल्याशी स्पर्धा करतो आहे ते ध्वजावरून! भारतापेक्षा आपला ध्वज उंच असला पाहिजे, या इरेनं पेटलेला पाकिस्तान आता दक्षिण आशियात सर्वात उंच ध्वज आपलाच असला पाहिजे, या इर्षेनं व्याकूळ झाला आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारनं त्यांच्या ७६व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजे १४ ऑगस्ट २०२३ रोजी पाचशे फूट उंच ध्वज उभारण्याची घोषणा नुकतीच केली आहे आणि त्यादृष्टीनं त्यांची तयारीही सुरू आहे. या ध्वजासाठी पाकिस्तानला किमान चाळीस कोटी पाकिस्तानी रुपये खर्च करावे लागतील!
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या हातापाया पडल्यानंतर दया येऊन त्यांनी पाकिस्तानला नुकतंच तीन अब्ज डॉलर्सचं कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला जणू हर्षवायू झाला आहे. इतके महिने झाले पाकिस्तानला कुणी दारातही उभं करत नसताना हे कर्ज मिळाल्यामुळे त्यांना अत्यानंद झाला आहे. त्यामुळे काही महिने त्यांची खाण्या-पिण्याची चिंता थोडीफार मिटेल, पण दिवाळखोरीच्या वाटेवर असलेल्या पाकिस्तानला नुसतं विदेशी कर्ज चुकविण्यासाठीच पुढील दोन वर्षांत किमान दोन हजार कोटी रुपयांची गरज आहे. आताशी तर त्यांना फक्त कर्ज मंजूर झालं आहे, तरीही त्यांनी उन्माद करायला सुरुवात केली आहे. १४ ऑगस्ट रोजी लाहोरच्या लिबर्टी चौकात हा ध्वज फडकविण्यात येणार आहे. ‘आम्हाला देशाचा, आमच्या ध्वजाचा, झेंड्याचा अभिमान आहेच, पण आधी आमच्या खाण्या-पिण्याचं बघा,’ असा घरचा आहेर पाकिस्तानी लोकांनीच आपल्या सरकारला दिला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झेंड्यावरून स्पर्धा सुरू झाली ती साधारणपणे सहा वर्षांपूर्वी. २०१७ मध्ये भारतानं अटारी-वाघा बॉर्डरवर ३६० फुटांचा दक्षिण आशियातील सर्वांत उंच ध्वज उभारला. त्यासाठी त्यावेळी भारताला साडेतीन कोटी रुपये लागले होते. याच ध्वजाच्या माध्यमातून भारत हेरगिरी करत असल्याचा आरोपही पाकिस्ताननं केला होता. नाकाला मिरच्या झोंबलेल्या पाकिस्ताननं त्यानंतर काहीच महिन्यांत पाकिस्ताननं भारतीय ध्वजाशेजारी आपल्या बॉर्डरवर त्याच ठिकाणी ४०० फूट उंचीचा झेंडा उभारला. त्याचवर्षी भारतानंही मग बॉर्डरवरजवळील जॉईंट चेक पोस्टवर ४१४ फूट उंचीचा टॉवर इन्स्टॉल केला होता. त्यामुळे विदेशी कर्जाची नुसती घोषणा झाल्याबरोबर पाकिस्ताननंही लगेच पाचशे फूट उंच झेंडा उभारण्याची तयारी सुरू केली आहे !
इमरान यांच्यामुळेच कर्जास विलंब!
पाकिस्तानात इमरान खान यांचं सरकार पडण्याच्या केवळ दोन दिवस आधी इमरान यांनी देशातील पेट्रोल-डिझेलचे भाव दहा रुपयांनी कमी केले होते. यावरून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नाराज झाली होती. कर्ज लांबलं जाण्यात याचाही मोठा वाटा होता. त्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अनेकदा देशातील पेट्रोल-डिझेलचे भाव वाढविले होते, पण तरीही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटी-शर्तींची पूर्तता त्यांना करता आली नव्हती !