कंगाल पाकिस्तान, लोक टोळ्या टोळ्यांनी दरोडे टाकू लागले; रमजान काळात १९ जणांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 01:02 PM2024-04-12T13:02:12+5:302024-04-12T13:02:37+5:30
पाकिस्तानात दहशतवाद्यांना पोसल्याने लोकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेकांकडे अन्नधान्य खरेदी करण्यासाठी पैसाच राहिलेला नाही.
कंगाल झालेल्या पाकिस्तानात गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. कराचीमध्ये रमजान काळात वेगवेगळ्या ठिकाणच्या दरोड्यांच्या घटनांमध्ये १९ जणांची हत्या करण्यात आली आहे. तर ५५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
पाकिस्तानात दहशतवाद्यांना पोसल्याने लोकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेकांकडे अन्नधान्य खरेदी करण्यासाठी पैसाच राहिलेला नाही. यामुळे हे लोक टोळ्या टोळ्यांनी दरोडे टाकू लागले आहेत. यावेळी जो विरोध करेल त्याला मारून टाकले जात आहे. पोलीस अधिकाऱ्याने एका न्यूज एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार रमजान काळात दरोडेखोरांना विरोध केल्याने कराचीत १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
जानेवारीपासून शहरातील दरोड्यांत आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. गेल्या वर्षी याच काळात २५ जणांचा मृत्यू झाला होता. तर ११० जण जखमी झाले होते. तर वर्षभरात १०८ जणांचा मृत्यू आणइ ४६९ जण जखमी झाले होते.
कराची पोलिसांनी दरोडेखोरांविरोधात ४२५ वेळा चकमक केली आहे. यामध्ये ५५ दरोडेखोर मारले गोले आहेत. तर ४३९ जखमी झाले आहेत. जवळपास ४ लाखांवर भिकारी आणि दरोडेखोर रमजान काळात कराचीमध्ये येतात. यामुळे या काळात गुन्ह्यांचे प्रमाण वाढते, असे पोलिसांनी सांगितले.