36 हजार फुटांवर झाला विवाह, पोप फ्रान्सीस यांनी हवेतच बांधली 'जोडप्या'ची लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 11:46 AM2018-01-19T11:46:53+5:302018-01-19T11:49:20+5:30
चिलीचमधील विमानामध्ये कार्यरत असणाऱ्या पाऊला पोडेस्ट आणि कार्लोस सियुफर्डी यांचा विवाह पोप फ्रान्सीस यांनी विमानातच लावून दिला.
सँटियागो- लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हटलं जातं. पण एका जोडप्याची लग्नगाठ मात्र हवेतच 36 हजार फूट उंचीवर बांधली गेली तिही पोप फ्रान्सीस यांच्या साक्षीने. चिलीच्या विमानवाहतूक कंपनीच्या विमानामध्ये कार्यरत असणाऱ्या पाऊला पोडेस्ट आणि कार्लोस सियुफर्डी यांचा विवाह पोप फ्रान्सीस यांनी विमानातच लावून दिला.
गंमत म्हणजे हा विवाहसोहळा काही नियोजित नव्हता. त्याचं झालं असं आपल्या विमानातून पोप प्रवास करत आहेत म्हटल्यावर विमानाचे सर्व कर्मचारी पहिल्या दर्जाच्या विभागामध्ये जमून पोप यांच्याबरोबर छायाचित्रे घेऊ लागले. या छायाचित्रांमध्ये पाऊला आणि कार्लोस यांचाही समावेश होता. फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करणाऱ्या या दोघांनीही आम्ही दोघे नवरा बायको आहोत असं त्यांना सांगितलं. त्यावर पोप यांनी तुम्ही दोघे चर्चमध्ये विवाहबद्ध झाला आहात का असे विचारले. त्यावर त्यांनी नाकारार्थी मान डोलावली. 'आम्ही दोघेही 2010 साली नोंदणी करुन विवाह केला मात्र चर्चमधील विधी पार पाडू शकलो नाही' असे त्यांना सांगितले. '2010 साली चिलीमध्ये झालेल्या भूकंपात चर्चचे नुकसान झाल्यामुळे तेथे विवाह सोहळा पार पाडता आला नाही' असेही त्यांनी पोप यांना सांगितले.
त्यावर फ्रान्सीस यांनी तात्काळ मी तुमचं लग्न लावून देतो असे सांगितले आणि विमानाचे सर्व कर्मचारी या अनोख्या विवाहसोहळ्याचे साक्षीदार झाले.
"Can't believe the Pope married us!" Lucky couple gets married aboard a plane by Pope Francis himself—the first time a Pope has celebrated a wedding during a flight. https://t.co/O00eXJJmTCpic.twitter.com/8sBw89UeKn
— ABC News (@ABC) January 18, 2018
यावर विमानात उपस्थित असणाऱ्या पत्रकारांशी बोलताना कार्लोस म्हणाला, 'हे सगळं ऐतिहासिक आहे, पोप यांनी विमानात लग्न लावून दिल्याचं कधीही घडलेलं नाही.' कार्लोस आणि पाऊला यांना दोन मुले आहेत. कार्लोस 41 वर्षांचे आणि पाऊला 39 वर्षांची आहे. त्यांना 6 वर्षांचा राफेल हा मुलगा आणि 3 वर्षांची इजाबेला ही मुलगी आहे. आता काही दिवसात एक 'मिनी हनिमून' ट्रीप करायचा विचार असल्याचं कार्लोसनी सांगितलं.