"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 05:43 PM2024-05-10T17:43:55+5:302024-05-10T17:44:42+5:30
Pope Francis : इटलीमध्ये जन्मदर आधीच खूप कमी आहे आणि १५ वर्षांपासून सतत घसरत आहे.
रोम : अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन पोप फ्रान्सिस यांनी इटलीतील लोकांना केले आहे. तसेच, देशाचे लोकसंख्याशास्त्रीय संकट भविष्यासाठी धोका असल्याचा इशारा देत कुटुंबांना मदत करण्यासाठी दीर्घकालीन धोरणांचीही मागणी सुद्धा पोप फ्रान्सिस यांनी केली आहे.
एका कार्यक्रमाला संबोधित करताना पोप फ्रान्सिस म्हणाले, "जन्मांची संख्या लोकांच्या अपेक्षा दर्शवते. मुले आणि तरुणांशिवाय देशाला भविष्याची कोणतीही आकांक्षा नसते." दरम्यान, इटलीमध्ये जन्मदर आधीच खूप कमी आहे आणि १५ वर्षांपासून सतत घसरत आहे.
गेल्या वर्षी तो विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला होता. गेल्या वर्षी देशात ३,७९,००० बालकांचा जन्म झाला. व्हॅटिकनच्या भक्कम पाठिंब्याने इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारने २०३३ पर्यंत दरवर्षी किमान ५,०,०००० बालकांच्या जन्मास प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
गेल्या वर्षी इटली सरकारने जारी केलेल्या अहवालात धक्कादायक एक बाब समोर आली होती. या अहवालात असे म्हटले होतेकी, इटलीमध्ये १५ ते ४९ वयोगटातील महिलांची कमतरता आहे. म्हणजेच या देशात प्रजननक्षम वयातील महिलांची कमतरता आहे, त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
गंभीर समस्या
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी तर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती आणि तो निवडणुकीचा मुद्दा बनला होता. यावरून या प्रकरणाचे गांभीर्य समजू शकते. आता पोप फ्रान्सिस यांनी इटलीतील लोकांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे, त्यामुळे ही समस्या किती गंभीर आहे, याचा सहज अंदाज येऊ शकतो.