भारतीय महिलेचा मृत्यू, पोर्तुगालच्या आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 10:46 AM2022-09-01T10:46:59+5:302022-09-01T10:48:08+5:30
पोर्तुगालच्या राजधानीत मंगळवारी तेथील आरोग्य मंत्र्यांची खूर्ची घालविणारा प्रकार घडला. भारतासाठी ते काहीच नसले तरी तेथील लोकांसाठी ही मोठी घटना होती
पोर्तुगालच्या राजधानीत मंगळवारी तेथील आरोग्य मंत्र्यांची खूर्ची घालविणारा प्रकार घडला. भारतासाठी ते काहीच नसले तरी तेथील लोकांसाठी ही मोठी घटना होती. एक भारतीय गर्भवती महिला पर्यटकाचा कार्डियाक अरेस्टमुळे हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याने तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होते. तेव्हा तिने प्राण सोडला. यावरून तेथील आरोग्य मंत्र्यांना राजीनामा दिल्यावा लागला आहे.
या घटनेच्या काही तासांनी मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला. रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता, आपत्कालीन कार सेवा बंद करणे आणि गर्भवती महिलांसाठी योग्य आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे टेमिडो यांना तीव्र टीकेचा सामना करावा लागला. या कारणास्तव त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.
टेमिडोने जे काही केले त्याबद्दल मी आभारी आहे. विशेषत: कोरोनाच्या काळात तिने आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले होते, असे पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी म्हटले. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय महिला 31 आठवड्यांची गर्भवती होती आणि तिला देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या सांता मारिया रुग्णालयात नेण्यात आले. महिलेने श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली होती.
महिलेची प्रकृती स्थिर झाल्यानंतर रुग्णालयाने तिला साओ फ्रान्सिस्को जेवियर रुग्णालयात हलविले, बेड उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले होते. रुग्णालयात नेत असताना महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. महिलेवर शस्त्रक्रिया करून नवजात शिशुला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.