युरो चषकात पोर्तुगालचा उपांत्य फेरीत प्रवेश
By admin | Published: July 1, 2016 03:33 AM2016-07-01T03:33:55+5:302016-07-01T03:33:55+5:30
युरो चषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व सामन्यातील अटीतटीच्या लढतीत पोर्तुगालनं पोलंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-3 असा विजय मिळवला.
ऑनलाइन लोकमत
मार्सिली, दि. 01- युरो चषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व सामन्यातील अटीतटीच्या लढतीत पोर्तुगालनं पोलंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-3 असा विजय मिळवला. निर्धारित 90 मिनिटांच्या खेळात पोलंड व पोर्तुगाल संघातील उपउपांत्य फेरीचा सामना 1-1 असा अनिर्णित होता. अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघ गोल करण्यात अयशस्वी ठरल्यानं सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर लागला. पोर्तुगालनं दमदार खेळी करत पोलंडवर विजय मिळवला आहे. युरोच्या इतिहासात पोर्तुगालचा 18 वर्षांचा रेनाटो स्नॅचेस हा तिसरा सर्वात कमी वयाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. रेनाटो स्नॅचेसला मॅन ऑफ द मॅच या किताबानंही गौरविण्यात आलं आहे.
या सामन्याची सुरुवात सनसनाटी झाली होती. दुसर्या मिनिटाला पोलंडच्या कॅमील ग्रोसीस्कीने चेंडूवर ताबा मिळवत डाव्या बाजूने थेट पोर्तुगालच्या गोलक्षेत्रात धडक दिली. त्याने रॉबर्ट लेवेन्स्कीला सुरेख पास दिला. या पासवर लेवेन्स्कीने चेंडू अचूक जाळ्यात ढकलून संघाला आघाडी मिळवून दिली. 33व्या मिनिटाला पोर्तुगालच्या रिनॅटो सांचेजने नानीच्या पासवर गोल नोंदवून संघाला 1—1 अशी बरोबरी साधून दिली. 44व्या मिनिटाला पोलंडच्या जे. आर्टरला पंचांनी यलो कार्ड दाखवले. यामुळे त्याला पुढील सामन्यात खेळता येणार नाही.
मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1—1 असे बरोबरीत होते. 65व्या मिनिटाला पोलंडच्या कॅमिल ग्लिकचा चुकीच्या पद्धतीने प्रतिस्पर्धी खेळाडूला रोखण्याचा प्रयत्न केल्याने पंचांनी त्याला यलो कार्ड दाखविले. उत्तरार्धात दोन्ही संघ गोल न करू शकल्याने सामना निर्धारित वेळेत 1—1 असा बरोबरीत राहिला होता. अखेर दमदार खेळीच्या जोरावर पोर्तुगालनं पेनल्टी शूटआऊटमध्ये पोलंडवर 5-3 अशा फरकानं विजय मिळवला.