आनंदाची बातमी; कोरोना व्हॅक्सीनचा 14 जणांवर केलेला प्रयोग यशस्वी, 'या' देशाने तयार केली लस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 03:17 PM2020-04-04T15:17:48+5:302020-04-04T15:33:53+5:30
या प्रयोगासाठी चीनने एकूण 108 लोकांची निवड केली होती. यापैकी 14 जणांनी या लसीच्या परीक्षणाचा कालावधी पूर्ण केला आहे. 14 दिवस क्वारनटाईन राहिल्यानंतर आता त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
वुहान - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. यातच आता चीनमधून एक दिलासादायक बातमी आली आहे. चीनने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी एक लस तयार केली आहे. 17 मार्चला त्यांनी या लसीचे माणसांवर प्रयोग करायलाही सुरुवात केली होती. या लसीचे चांगले परिणाम आता समोर येऊ लागले आहेत.
108 जणांची करण्यात आली होती निवड -
या प्रयोगासाठी चीनने एकूण 108 लोकांची निवड केली होती. यापैकी 14 जणांनी या लसीच्या परीक्षणाचा कालावधी पूर्ण केला आहे. 14 दिवस क्वारनटाईन राहिल्यानंतर आता त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. हे सर्व जण आता पूर्णपणे सुरक्षित असून वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. हा प्रयोग वुहान शहरात सुरू करण्यात आला होता.
18 ते 60 वर्ष वयातील लोकांवर करण्यात आली टेस्ट -
ही लस चेन व्ही आणि त्यांच्या चमूने तयार केली आहे. ज्या 108 जणांवर या लसीचे परीक्षण सुरू आहे ते सर्वजण 18 ते 60 वर्ष वयातील आहेत. या सर्वांना तीन गटांत विभागण्यात आले होते. या तीनही गटातील लोकांना संबंधित लस वेगवेगळ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या दिवशी देण्यात आली. तसेच त्यांना वुहानमधील विशेष सेवा आरोग्य केंद्रात क्वारनटाईन करण्यात आले होते. त्यांना त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण होईपर्यंत तेथेच राहावे लागणार आहे.
...तर बाजारात येणार लस -
घरी पाठवण्यात आलेले 14 जण सहा महिन्यांसाठी वैद्यकीय देखरेखीखाली राहतील. या काळात त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले तर त्यांचे शरीर कशाप्रकारे कोरोनाचा सामना करते हे पाहिले जाईल. त्यांच्या शरिरात कोरोनाचा प्रतिकार करण्याची क्षणता निर्माण झाल्यास, त्यांच्या रक्ताचे नमुने तपासून ही लस बाजारात आणली जाईल. यासंदर्भात बोलताना चेन व्ही म्हणाले, आमचा पहिला प्रयोग जवळपास यशस्वी झाला आहे. आम्हाला याची पुरेपूर खात्री पटली, की आम्ही ही लस बाजारात आणू.