एच-१बी व्हिसावरील निर्बंधाच्या आदेशावर आज स्वाक्षरीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 02:48 AM2020-06-22T02:48:08+5:302020-06-22T02:48:46+5:30
कोरोनाची साथ, अमेरिकेची डळमळलेली अर्थव्यवस्था व वाढलेली बेकारी यामुळे एच-१बी व्हिसा देण्यावर काही निर्बंध घालणे ट्रम्प यांना आवश्यक वाटते.
वॉशिंग्टन : अमेरिकेत नोकरीधंद्यासाठी जाणाऱ्या भारतीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या एच-१बी व्हिसावर आणखी निर्बंध घालण्याच्या आदेशावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या, सोमवारी सही करण्याची शक्यता आहे. कोरोनाची साथ, अमेरिकेची डळमळलेली अर्थव्यवस्था व वाढलेली बेकारी यामुळे एच-१बी व्हिसा देण्यावर काही निर्बंध घालणे ट्रम्प यांना आवश्यक वाटते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेतील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळावा तसेच स्थलांतरितांचे लोंढे कमी करावेत या उद्देशाने हे निर्बंध घालण्यात येतील. या निर्णयाने अमेरिकेतील नागरिकांना नक्कीच आनंद होणार आहे. बाहेरील देशांतून अमेरिकेत नोकरीधंद्यासाठी येणाºया लोकांसाठी दिल्या जाणाºया व्हिसावर लादलेले निर्बंध बराच काळ कायम राहण्याची शक्यता आहे.
एच-१बी व्हिसा देण्यावर निर्बंध लादले तर त्याचा सर्वात मोठा फटका भारतीयांना बसणार आहे. त्यामुळे अनेकांचे अमेरिकेला जाऊन काम करण्याचे स्वप्न भंग पावू शकते. अमेरिकी सरकार दरवर्षी ८५ हजार एच-१बी व्हिसा देते. त्यामध्ये ७० टक्के भारतीय असतात. एच-१ बी व्हिसावर याआधीच अमेरिकेत आलेल्यांचेही ट्रम्प यांनी निर्बंध लादल्यास नुकसान होणार आहे.