कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना युरोपमध्ये प्रवासबंदीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 10:31 AM2021-06-29T10:31:11+5:302021-06-29T10:32:06+5:30
प्रश्नावर लवकरच तोडगा : अदर पूनावाला
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेली व भारतात उत्पादित झालेली कोविशिल्ड लस घेतलेल्या असंख्य भारतीयांना यापुढे युरोपमध्ये कदाचित प्रवास करता येणार नाही. ज्या लसींना युरोपीय समुदायाने मंजुरी दिली आहे, त्यामध्ये कोविशिल्डचे नाव नसल्यामुळे ही शक्यता निर्माण झाली आहे.
युरोपीय समुदायाने आतापर्यंत कोमिर्नाती (फायझर/ बायोएनटेक), मॉडेर्ना, वॅक्सझेर्वरिया (अॅस्ट्राझेनेका- ऑक्सफर्ड विद्यापीठ), जॅनस्सेन (जॉन्सन अँड जॉन्सन) या चार कोरोना प्रतिबंधक लसींनाच मान्यता दिली आहे. कोविशिल्ड व वॅक्सझेर्वरिया या दोन्ही लसी अॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठानेच विकसित केल्या आहेत. मात्र भारतात सीरम इन्स्टिट्यूटतर्फे उत्पादित होणाऱ्या कोविशिल्ड लसीला युरोपीय समुदायाने अद्याप मान्यता दिलेली नाही. मात्र वॅक्सझेर्वरिया लसीचे उत्पादन ब्रिटनमध्येच होते. त्यामुळे युरोपमध्ये तिला अडसर आलेला नाही.
भारतात बहुतांश लोक कोविशिल्ड लस घेत आहेत. ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्या प्रवाशाला युरोपमध्ये प्रवेश दिला जाईल का, याबद्दल सध्या तरी संदिग्धताच आहे. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे लसींच्या वाटपासाठी राबविण्यात येणाऱ्या कोवॅक्स कार्यक्रमामध्ये कोविशिल्डचा समावेश आहे. अशा मान्यताप्राप्त लसीबाबत युरोपीय समुदाय अडवणुकीचे धोरण अवलंबत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रश्नावर लवकरच तोडगा : अदर पूनावाला
असंख्य भारतीयांनी कोविशिल्ड लस घेतली असून त्यांना युरोपला जाण्यात अडचणी येत आहेत. हा प्रश्न मी संबंधितांकडे मांडला असून नियंत्रक व राजनैतिक स्तरावर लवकरच त्याबाबत तोडगा निघेल, अशी आशा सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केली आहे.