काश्मीर वगळून झुकेरबर्गने भारताचा चुकीचा नकाशा केला पोस्ट
By admin | Published: May 14, 2015 04:26 PM2015-05-14T16:26:52+5:302015-05-14T21:16:31+5:30
फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने आपल्या टाईमलाईनवर टाकलेल्या पोस्टमध्ये भारताचा नकाशा चुकीचा दाखवण्यात आल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने आपल्या टाईमलाईनवर टाकलेल्या पोस्टमध्ये भारताचा नकाशा चुकीचा दाखवण्यात आल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे. या पोस्टमुळे नेटिझन्समध्ये तीव्र नाराजी पसरली असून काश्मीरला भारताच्या नकाशात दाखवण्यात यावे अशा सूचना या पोस्टवरील कॉमेंट्समध्ये करण्यात येत आहेत.
झुकरेबर्गने त्याच्या टाईमलाईनवर 'इंटरनेट डॉट ओआरजी'बाबत माहिती देणारी पोस्ट अपलोड केली आहे. आफ्रिकेतील मलावी येथे 'इंटरनेट डॉट ओआरजी' माध्यमातून विनामूल्य सेवा सुरु करण्यात आल्याबाबत मार्क यांने फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली असून त्याच पोस्टमध्ये ज्या देशांना अशी सुविधा देण्यात आली आहे त्यांची नावे व नकाशे देण्यात आले आहेत. मात्र त्या पोस्टमधील भारताच्या नकाशात काश्मीरचा भाग वगळण्यात आला आहे. यामुळे तमाम भारतीय नेटिझन्स चांगलेच नाराज झाले असून त्यांनी आपाला आक्षेप नोंदवला आहे तसेच हा नकाशा सुधारण्याची सूचनाही झुकेरबर्गला केली आहे.
दरम्यान याप्रकरणी झुकेरबर्गने आत्तापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून त्या पोस्टमधील नकाशातही अद्याप बदल करण्यात आलेला नाही.