Video : इस्लामाबादमध्ये लागले संजय राऊत यांच्या भाषणाचे पोस्टर; पाकिस्तानचा जळफळाट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 09:07 PM2019-08-06T21:07:36+5:302019-08-06T21:13:24+5:30
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला.
मुंबई : जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्याचे कलम 370 रद्द करताना राज्यसभेमध्ये संजय राऊत यांनी भाषण केले होते. यावेळी त्यांनी आज जम्मू काश्मीर घेतलेय, उद्या बलुचिस्तान आणि पीओकेसुद्धा ताब्यात घेऊ, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे आणि राऊतांच्या फोटोचे पोस्टर इस्लामाबादमध्ये लागले आणि एकच खळबळ उडाली.
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये जोरदार भाषण करून केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला. राज्यसभेत आणि लोकसभेतही हा प्रस्ताव बहुमताने मंजूरही करण्यात आला.
राऊत यांचे भाषण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इस्लामाबादमध्ये एकच खळबळ उडाली. हमरस्त्यावर जागोजागी राऊत यांच्या भाषणातील वाक्य आणि लोकसभेत बोलतानाचा फोटो छापलेले पोस्टर लागले होते. हे एका पाकिस्तानी युवकाच्या लक्षात आले. यानंतर पाकिस्तानात हे पोस्टर लावणारा कोण, असा सवाल उठू लागला आहे.
इस्लामाबादमध्ये साजिद नावाच्या एका तरुणाने एक व्हिडीओ आज फेसबुकवर पोस्ट केला आहे. इस्लामाबादमध्ये प्रेस क्लब एफ-6 च्या समोरच्या रस्त्यावर प्रत्येक पोलवर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर ‘MAHA-BHARAT- A Step Forward’ – असे लिहिले आहे.
राऊतांचे भाषण
''कलम 370 हटवणे म्हणजे एका भस्मासुराचा वध करण्यासारखे आहे. एका सैतानाला मारण्यासारखे आहे. हे कलम म्हणजे गेल्या 70 वर्षांपासून देश आणि संविधानावर लागलेला डाग होता. तो आज धुवून निघाला आहे. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न आपल्या पूर्वजांनी पाहिले होते. ते आज पूर्ण झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर, दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आज स्वर्गातून अमित शहांचे कौतुक करत करत असतील.'' अशा शब्दात संजय राऊत यांनी अमित शहांचे कौतुक केले होते.