अमेरिकेच्या पासपोर्टची ‘पॉवर’ घटली; बलाढ्य देशाला आणखी एक धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 05:22 AM2020-07-13T05:22:27+5:302020-07-13T06:25:58+5:30
या देशाची क्रमवारी २८ वी आहे. कोरोना साथीच्या काळात अमेरिकेच्या पासपोर्टची पॉवर मात्र कमी झाली आहे.
वॉशिंग्टन : कोरोनाच्या संकटाशी झगडत असलेल्या अमेरिकेला पासपोर्टच्या निमित्ताने आणखी एक धक्का बसला आहे. कारण, अमेरिकेच्या पासपोर्टची शक्ती आता कमी झाली आहे. सध्या या पासपोर्टची किंमत मेक्सिकोच्या पासपोर्टपेक्षा अधिक राहिलेली नाही.
कोरोनानंतरचे एकूणच चित्र बदलले आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्समध्ये अमेरिका नेहमीच टॉप १० मध्ये राहिलेला आहे. अमेरिकेचा नंबर याबाबतीत सहावा अथवा सातवा राहिलेला आहे. कोरोनाच्या साथीपूर्वी अमेरिकेच्या पासपोर्टने जगात १८५ ठिकाणी जाता येत होते. मात्र, आता युरोपियन युनियनने अमेरिकींसाठी मार्ग रोखला आहे. म्हणजेच, अमेरिकी पासपोर्टने आता १५८ ठिकाणीच जाता येणार आहे. हा स्तर उरुग्वेच्या जवळपास जाणारा आहे. या देशाची क्रमवारी २८ वी आहे. कोरोना साथीच्या काळात अमेरिकेच्या पासपोर्टची पॉवर मात्र कमी झाली आहे. (वृत्तसंस्था)
ट्रम्प यांनी प्रथमच मास्क लावला; चार महिन्यांनी झाली उपरती
- अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या ३२ लाखांवर व मृत्यूंची संख्या १.३४ लाखांवर पोहोचली तरी मास्क वापरण्यास कसून विरोध करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी शनिवारी सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच नाका-तोंडाला मास्क लावल्याचे दिसले.
- वॉशिंग्टनच्या उपनगरातील वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमध्ये जखमी सैनिकांना व ‘कोरोना योद्ध्यां’ना भेटायला गेले तेव्हा मास्क लावलेल्या ट्रम्प यांचे रुपडे लोकांना पाहायला मिळाले. ‘हॉस्पिटलमध्ये जाताना मास्क लाऊन जाणे उत्तम असते’, असे पत्रकारांना सांगत ट्रम्प हेलिकॉप्टरमध्ये बसले. हेलिकॉप्टरमधून उतरून इस्पितळात फेरफटका मारताना त्यांनी मास्क वापरला.
- अमेरिकेत कोरोना साथीचा उद्रेक झाल्यावर उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स व अनेक राज्यांच्या रिपब्लिकन गव्हर्नरांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे सुरू केले; परंतु ट्रम्प मात्र मास्कची खिल्ली उडवीत राहिले.
- गेल्या तीन महिन्यांत त्यांनी पत्रकार परिषदा, सरकारी बैठका किंवा जाहीर सभांच्या वेळीही मास्क वापरण्याचे आवर्जून टाळले होते.
- ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार सतत तोंडाला मास्क लावून वावरणे हे ट्रम्प दुबळेपणाचे लक्षण मानत होते. शिवाय नेत्यानेच असा दुबळेपणा दाखविल्यावर लोकांना स्वत:च्या आरोग्याचीही अधिक काळजी वाटू लागते, असेही त्यांचे मत होते. मात्र, आता चार महिन्यांनी त्यांना मास्क वापरण्याची उपरती नेमकी कशामुळे झाली, हे समजू शकले नाही.
सरकारविरुद्ध जॉन हॉप्किन्सही न्यायालयात
- अमेरिकेत आॅनलाइन शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. यापूर्वी हार्वर्ड आणि एमआयटी यासारख्या प्रतिष्ठित उच्च शिक्षण संस्थांनी अमेरिकी प्रशासनाविरुद्ध खटला दाखल केला होता.
- ट्रम्प प्रशासनाने गत सोमवारी निर्णय घेतला होता की, ज्या शिक्षण संस्थेमध्ये सध्या वर्ग सुरु आहेत अशाच संस्थेमधील विद्यार्थ्यांना देशात राहण्याची परवानगी दिली जाईल. तर, अनेक विद्यापीठांनी कोरोनामुळे आॅनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.