काबूलमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट 80 ठार, 350 जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2017 10:19 AM2017-05-31T10:19:06+5:302017-05-31T14:44:54+5:30
अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहर बुधवारी सकाळी बॉम्बस्फोटाने हादरले. परदेशी दूतावास असलेल्या वझीर अकबर खान भागात हा बॉम्बस्फोट झाला.
Next
ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. 31 - अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहर बुधवारी सकाळी शक्तीशाली बॉम्बस्फोटाने हादरले. या बॉम्बस्फोटा आतापर्यंत 80 जण ठार झाले असून, 350 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे. परदेशी दूतावास असलेल्या वझीर अकबर खान भागात हा बॉम्बस्फोट झाला. भारतीय दूतावासाच्या कार्यालयापासून 50 मीटर अंतरावर हा बॉम्बस्फोट झाला. भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती भारतीय प्रतिनीधी मनप्रीत व्होरा यांनी दिली.
बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर असलेले घराचे दरवाजे आणि काचा फुटल्या. वझीर अकबर खान भागातून काळया धुराचे लोट उठताना दिसत आहेत. स्फोटात अनेक गाडयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी गोंधळाची स्थिती असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
बॉम्बस्फोट झालेल्या परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. जर्मन दूतावासाजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता अशी माहिती काबूल पोलिसांनी दिली. कोणाला टार्गेट करण्याच्या उद्देशाने हा बॉम्बस्फोट करण्यात आला ते स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी सुद्धा काबूलमधील दूतावास असलेल्या भागात अशा प्रकारचे बॉम्बस्फोट झाले आहेत.
अजून कुठल्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतली नसली तरी, पण तालिबानवर संशय आहे. मागच्या महिन्यात तालिबानने अशा प्रकारचे हल्ले करण्याची धमकी दिली होती. परदेशी फौजा आणि नागरीक तालिबानचे मुख्य लक्ष्य आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेचे 8400 आणि नाटोचे 5 हजार सैनिक आहेत.
तालिबानने अलीकडे मझार-ए-शरीफ भागातील अफगाण लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 135 सैनिक ठार झाले होते. इसिसही अफगाणिस्तानात सक्रीय असून मागच्या महिन्यात अमेरिकेने अफगाणिस्तानच्या ननगरहार भागातील इसिसचे तळ उद्धवस्त करण्यासाठी जगातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्बहल्ला केला होता. इसिसचे दहशतवादी वापरत असलेले बंकर आणि बोगद्यांना लक्ष्य करण्याच्या इराद्याने 9800 किलो वजनाचा हा बॉम्ब टाकण्यात आला.
By God's grace, Indian Embassy staff are safe in the massive #Kabul blast.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) May 31, 2017
Explosion in Kabul, reportedly near Wazir Akbar Khan area, Kabul PD 10: Afghan Media pic.twitter.com/5joCXNwkqV
— ANI (@ANI_news) May 31, 2017