शक्तिशाली भूकंपाने चिली हादरला

By admin | Published: September 18, 2015 02:55 AM2015-09-18T02:55:53+5:302015-09-18T03:09:17+5:30

चिलीत बुधवारी रात्री शक्तिशाली भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ८.३ एवढी होती. यात ८ जण मृत्युमुखी पडले असून, किनारपट्टी भागातील लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी

The powerful earthquake shook Chile | शक्तिशाली भूकंपाने चिली हादरला

शक्तिशाली भूकंपाने चिली हादरला

Next

सँटियागो : चिलीत बुधवारी रात्री शक्तिशाली भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ८.३ एवढी होती. यात ८ जण मृत्युमुखी पडले असून किनारपट्टी भागातील लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. भूकंपाची तीव्रता पाहता त्सुनामी लाटा उसळून त्या जपानपर्यंत धडकू शकतात, असे इशारे देण्यात आले. धक्का एवढा जोरदार होता, की चिलीपासून १,५०० कि. मी. अंतरावरील अर्जेंटिना व ब्युनस आयर्स येथील इमारतीही हादरल्या. चिलीत लोेक घाबरून रस्त्यावर आले. हा भूकंप भूकंपप्रवण चिलीच्या इतिहासातील सहावा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. त्याचप्रमाणे जगातील या वर्षीचाही तो सर्वात तीव्र भूकंप ठरला, असे उपगृहमंत्री महमूद अलेयुय यांनी सांगितले. गृहमंत्री जोर्ज बुर्गोस यांनी मृतांचा आकडा आठ असल्याचे सांगितले. पहिल्या भूकंपानंतर शक्तिशाली भूकंपोत्तर धक्का बसला आणि प्रशासनाने त्सुनामीचा इशारा देत किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले. त्सुनामीचा इशारा रात्रभर कायम होता. गुरुवारी तो मागे घेण्यात आला. न्यूझीलंडसह प्रशांत पट्ट्यातील इतर देशांतही त्सुनामीचे इशारे देण्यात आले होते. चिलीत किनारपट्टी भागातील विद्युतपुरवठा खंडित होऊन १ लाख ३५ हजार घरे अंधारात बुडाली, असे राष्ट्रीय आपत्ती कार्यालयाने सांगितले. भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ असलेल्या मध्य चोआपा प्रांताला आपत्ती क्षेत्र घोषित करून तेथे लष्करी राजवट लागू करण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू चिलीची राजधानी सँटियागोपासून उत्तरेला २२८ कि. मी. वर व उथळ होता. त्याची तीव्रता ८.३ रिश्टर स्केल होती, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने म्हटले आहे. चिली सरकारने मात्र मुख्य भूकंपाची तीव्रता ८.४ रिश्टर स्केल असल्याचे सांगितले. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किनारपट्टीवरील शहरे आणि नगरातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले. या भागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळील इल्लापेल शहराला भूकंपाचा सर्वाधिक तडाखा बसला. या शहरातील विद्युत पुरवठा खंडित होण्यासह अनेक घरे, इमारती कोसळल्या तसेच अनेक लोक जखमी झाले. चिलीला अनेक भूकंपोत्तर धक्के बसले. त्यातील एकाची तीव्रता सात रिश्टर स्केलहून अधिक तर चार धक्क्यांची सहाहून अधिक होती. भूकंपाचा धक्का ब्यूनस आयर्स, अर्जेंटिना आणि खंडाच्या इतर भागात जाणवला. पेरू आणि ब्राझीलमधील लोकांनाही तो जाणवला. चिलीच्या बाहेर कुठेही जीवितहानीचे वृत्त नाही. (वृत्तसंस्था) २०१० नंतरचा सर्वात तीव्र धक्का २०१० मधील भूकंप व त्सुनामीनंतरचा हा सर्वात शक्तिशाली धक्का होता. २५ एप्रिल रोजी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल होती. २०१० चा भूकंप व त्सुनामीने प्रचंड हानी घडवून आणली होती तसेच नेपाळच्या भूकंपातही मोठी जीवित व वित्तहानी झाली होती. तथापि, चिलीच्या भूकंपाची तीव्रता २०१० च्या भूकंपानंतरची सर्वाधिक असली तरी सुदैवाने हानी कमी आहे. धीमी सुरुवात, नंतर तीव्र होत गेला कंप कंप हळूहळू सुरू होऊन नंतर तीव्र आणि अधिक तीव्र होत गेला, असे सँटियागोतील रहिवासी जेन्नेट्टे माट्टे यांनी सांगितले. आम्ही १२ व्या मजल्यावर होतो. कंप थांबत नव्हता. त्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो. सुरुवातीला धरणी एका बाजूकडून दुसºया बाजूकडे अशी हलली व नंतर ती खाली-वर अशी हलू लागली, असे त्या म्हणाल्या.

Web Title: The powerful earthquake shook Chile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.