प्रणव मुखर्जींच्या भेटीने द्विपक्षीय संबंध दृढ होतील
By admin | Published: October 8, 2015 01:51 AM2015-10-08T01:51:49+5:302015-10-08T01:51:49+5:30
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुढील आठवड्यातील प्रस्तावित इस्रायल भेटीमुळे दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, अशा भावना इस्रायलमध्ये व्यक्त होत आहेत.
जेरुसलेम : भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुढील आठवड्यातील प्रस्तावित इस्रायल भेटीमुळे दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, अशा भावना इस्रायलमध्ये व्यक्त होत आहेत. ही भेट म्हणजे द्विपक्षीय संबंधांतील ऐतिहासिक मैलाचा दगड, असे वर्णन केले जात आहे. इस्रायलच्या भेटीवर जाणारे ते पहिले भारतीय राष्ट्रपती ठरणार आहेत.
भारताच्या राष्ट्रपतींच्या भेटीमुळे अर्थकारण, विज्ञान, औषधशास्त्र आणि कृषी अशा सर्व क्षेत्रांतील दोन्ही देशांचे संबंध वाढीस लागतील, असे मत इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रियुवेन रिवलिन यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सहा दिवसांच्या मध्यपूर्वेच्या भेटीस जात आहेत. त्यामध्ये १३ आॅक्टो. ते १५ आॅक्टो. हा काळ ते इस्रायलच्या दौऱ्यावर
असतील. इस्रायलबरोबर ते जॉर्डन आणि रामल्लासही भेट देणार
आहेत. राष्ट्रपतींची भेट अत्यंत महत्त्वाची आहे. या भेटीमध्ये ते इस्रायलची संसद नेसेटलाही संबोधित करणार आहेत.
नेसेटला संबोधित करण्याचा मान अत्यंत मोजक्या नेत्यांना मिळाला आहे, त्यामध्ये आता मुखर्जी यांचा समावेश होईल. त्याचप्रमाणे जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठातर्फे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा डॉक्टरेट पदवीने सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्या शिष्टमंडळात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह सहा खासदारांचा समावेश असेल.
भारत-इस्रायल संबंध!
भेटीचे राजकीय महत्त्व : राष्ट्रपती या भेटीत इस्रायलचे राष्ट्रपती रियुवेन रिवलिन यांच्यासह पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू, संसद नेसेटचे सभापती युली एडेलस्टेन, विरोधी पक्षनेते आयझॅक हरझॉग यांची भेट घेणार आहेत.
1992 साली भारत व इस्रायल यांच्यामध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित झाले.
2000 साली तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी इस्रायलला भेट दिली.
2003 साली इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांनी भारतास भेट दिली.
त्यानंतर अनेक भारतीय नेत्यांनी इस्रायलला भेट दिली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना नरेंद्र मोदी यांनीही इस्रायलला भेट दिली आहे. मागील वर्षी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही जेरुसलेमला भेट दिली होती. मात्र, अद्याप भारताच्या पंतप्रधानपदी व राष्ट्रपतीपदी असणाऱ्या व्यक्तीने इस्रायलला भेट दिलेली नाही.
त्यामुळे प्रणव मुखर्जी हे इस्रायलला जाणारे पहिले भारतीय राष्ट्रपती ठरणार आहेत. इस्रायल आणि भारताचे सध्या शेती, तंत्रज्ञान, औषध, संरक्षण सामुग्री अशा विविध क्षेत्रांमध्ये संबंध प्रस्थापित झालेले आहेत. संयुुक्त राष्ट्रच्या आमसभेवेळेस न्यूयॉर्क येथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी एकमेकांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली होती.