अत्यावश्यक वस्तूंचा साठा करा; चिनी सरकारचे नागरिकांना आदेश; ड्रॅगन युद्धाच्या तयारीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 07:44 AM2021-11-03T07:44:12+5:302021-11-03T07:46:21+5:30
अत्यावश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ; अनेक ठिकाणी तुटवडा जाणवू लागल्यानं प्रशासन अडचणीत
बीजिंग: विस्तारवादी धोरणामुळे डझनभरहून अधिक देशांशी संघर्ष करणाऱ्या चीनमध्ये सध्या वेगवान हालचाली पाहायला मिळत आहेत. चीन तैवानसोबत युद्ध घोषित करण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. चीनमधील कम्युनिस्ट सरकारनं आपल्या नागरिकांना दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या वस्तूंचा साठा करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे अन्नधान्य, मीठ, साखर, तेल यासारख्या वस्तूंना असलेली मागणी वाढली आहे.
चीनमधील अनेक भागांत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक भागांत स्थानिक प्रशासनाला मागणीनुसार पुरवठा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचं आव्हानही प्रशासनासमोर आहे. चीन आणि तैवान यांच्यामध्ये बऱ्याच कालावधीपासून तणावाची स्थिती आहे. गेल्या काही दिवसांत परिस्थिती आणखी चिघळली आहे. चीननं वारंवार तैवानला कारवाईची धमकी दिली आहे.
सोमवारी रात्री उशिरा चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. आपत्कालीन स्थितीत आवश्यक असलेल्या वस्तूंचा साठा करण्याचे आदेश देण्यात आले. 'कोविड-१९ चा वाढलेला प्रादुर्भाव आणि मुसळधार पाऊस यांच्यामुळे भाज्या आणि इतर वस्तूंच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवा,' अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मात्र चिनी सोशल मीडिया विवोवर वेगळीच चर्चा आहे. शेजारी राष्ट्र असलेल्या तैवानसोबत तणाव वाढल्यानं अशा प्रकारचे आदेश जारी करण्यात आल्याचा चिनी नागरिकांचा अंदाज आहे.
सरकारनं जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याच्या सूचना करताच आसपासच्या सर्व वृद्ध व्यक्ती सुपरमार्कटमध्ये खरेदीसाठी पोहोचल्या, असं एका यूजरनं विवोवर लिहिलं आहे. स्थानिक माध्यमांनी नुकतीच बिस्किट्स, इन्स्टंट न्यूडल्स, व्हिटामिनसह घरात साठा करता येऊ शकणाऱ्या आवश्यक सामानांची यादी प्रसिद्ध केली आहे. लोकांची खरेदीसाठी उडालेली झुंबड पाहता चीनच्या सरकारी माध्यमांनी स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली आहे. लोकांनी विनाकारण चिंता करू नये, असं आवाहन चिनी कम्युनिस्ट पक्षाचं समर्थन करणाऱ्या 'द इकॉनॉमिक डेली' या वृत्तपत्रानं केलं आहे.