भारत-चीन सीमा वादात मध्यस्थीची तयारी- डोनाल्ड ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:46 PM2020-05-27T23:46:58+5:302020-05-27T23:47:17+5:30
प्रश्न सोडविण्यास योग्य ते मार्ग उपलब्ध; उभय देशांतील सीमा साडेतीन हजार कि.मी.ची
वॉशिंग्टन : भारत आणि चीन यांच्यात सीमेवर निर्माण झालेल्या तणावात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी ‘मी दोन्ही देशांत मध्यस्थी करण्यास तयार व समर्थ आहे’, असे म्हटले. दरम्यान, चीनने सामोपचाराची भूमिका घेत दोन्ही देशांतील प्रश्न सोडविण्यासाठी उभय देशांकडे संवाद व चर्चेचे मार्ग उपलब्ध असल्याचे म्हटले.
यापूर्वी ट्रम्प यांनी काश्मीरच्या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेकवेळा मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली होती व त्यांना स्पष्ट नकारही मिळाला होता. भारत आणि चीन यांच्यात मध्यस्थी करण्याची तयारी ट्रम्प यांनी टिष्ट्वटरवर दाखवली. ते म्हणाले,‘‘माझी जी तयारी आहे त्याबद्दल मी भारत आणि चीन यांना माहिती दिली आहे.
भारत आणि चीन यांच्यातील वाढलेल्या सीमावादात अमेरिकेची मध्यस्थी किंवा लवाद म्हणून काम करण्याची तयारी असल्याचे आम्ही दोन्ही देशांना कळवले आहे,’’ असे ते टिष्ट्वटरवर म्हणाले. ट्रम्प यांच्या या तयारीवर भारतीय अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. तसेच ट्रम्प यांनी भारताला देकार औपचारिकपणे कळवला आहे की नाही यालाही दुजोरा मिळालेला नाही.
भारत आणि चीन यांच्यात जवळपास साडेतीन हजार किलोमीटरची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे. लडाख आणि उत्तर सिक्कीममध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील अनेक भागांत दोन्ही देशांच्या लष्करांनी नुकतेच लष्कर आणून ठेवले आहे. यातून तणाव वाढला आहे. परंतु, बुधवारी चीनने सामोपचाराची भूमिका घेत म्हटले की, भारतासोबतच्या सीमेवरील परिस्थिती ‘एकूण स्थिर आणि नियंत्रणात’ आहे आणि दोन्ही देशांकडे प्रश्न संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी योग्य यंत्रणा व संवादाच्या वाहिन्या आहेत.
भारताने म्हटले की, चीनचे लष्कर लडाख आणि सिक्कीममधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील नेहमीच्या गस्तीच्या कामात अडथळे आणत आहे. चीनच्या बाजूकडे भारतीय सैन्याने बेकायदा प्रवेश केल्यामुळे दोन देशांतील सैन्यात तणाव वाढल्याचे चीनचे म्हणणे स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले की, भारताने त्याच्या सर्व हालचाली या सीमेवरील भागात केल्या आहेत. भारताने नेहमीच सीमा व्यवस्थापनाबाबत जबाबदारीचीभूमिका घेतली आहे. भारत स्वत:ची स्वायतत्ता व सुरक्षा जपण्यास पूर्णपणे बांधील आहे, असे ते म्हणाले.