गाझाचे सर्वात मोठे हॉस्पिटल पाडण्याची तयारी; इस्रायलने बुलडोझर आणले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 12:54 PM2023-11-16T12:54:57+5:302023-11-16T12:56:17+5:30
इस्रायली लष्कराच्या या वेगवान कारवाईनंतर पॅलेस्टाईनने आता भारताकडे मदतीचे आवाहन केले आहे.
इस्त्रायल हमास युद्धात आता गाझातील सर्वात मोठे हॉस्पिटल पाडण्याची तयारी इस्त्रायली सैनिकांनी सुरु केली आहे. अल शिफाच्या खाली सुरुंग असून त्यामध्ये हमासचे कमांड सेंटर असल्याचा दावा अमेरिका आणि इस्त्रायलने केला आहे. निम्म्या गाझावर ताबा मिळविणारी इस्त्रायली सेना आता हमासला पूर्ण उध्वस्त करण्याकडे कूच करत आहे.
दुसरीकडे पॅलेस्टाईन भारताकडे युद्ध थांबविण्यासाठी मदत मागत आहे. इस्रायली सैन्य अल शिफामध्ये शोधमोहिम सुरु करत असून हॉस्पिटल पाडण्यासाठी बुलडोझर आणण्यात आले आहेत. हॉस्पिटलच्या आवारात बुलडोझरचा आवाज घुमू लागला असून या हॉस्पिटलमध्ये नवजात बालकांसह २३०० रुग्ण, डॉक्टर, नर्स आणि नागरिक असल्याचा दावा युएनने केला आहे.
इस्रायलच्या आरोपांनुसार हमासने अल शिफा हॉस्पिटलच्या खाली आपले कमांड सेंटर बांधले आहे. अमेरिकेनेही या दाव्याचे समर्थन केले असून आपल्या गुप्तचर संस्थेनेही हेच अपडेट दिल्याचे म्हटले आहे. मात्र, हमासने हे नाकारले आहे. पॅलेस्टाईनचा आरोप आहे की इस्रायली सैन्याने रुग्णालयाभोवती बुलडोझर तैनात केले आहेत, जे अत्यंत धोकादायक आहे.
इस्रायली लष्कराच्या या वेगवान कारवाईनंतर पॅलेस्टाईनने आता भारताकडे मदतीचे आवाहन केले आहे. पॅलेस्टाईनने म्हटले आहे की, भारत हा एक शक्तिशाली देश आहे, तो इस्त्रायलला रोखू शकतो. पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत अदनान अबू म्हणाले की, महात्मा गांधींनंतर भारताने नेहमीच पॅलेस्टाईनचा प्रश्न समजून घेतला आहे आणि शांतता प्रस्थापित करण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे.