आउटसोर्सिंगविरोधातील विधेयक अमेरिकेत सादर
By admin | Published: March 4, 2017 04:24 AM2017-03-04T04:24:07+5:302017-03-04T04:24:07+5:30
आउटसोर्सिंगविरोधातील द्विपक्षीय विधेयक गुरुवारी अमेरिकेच्या काँग्रेस सभागृहात पुन्हा दाखल केले गेले.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील नोकऱ्या भारतासारख्या दुसऱ्या देशांत जाऊ नये म्हणून आउटसोर्सिंगविरोधातील द्विपक्षीय विधेयक गुरुवारी अमेरिकेच्या काँग्रेस सभागृहात पुन्हा दाखल केले गेले. विधेयकातील तरतुदीनुसार, अमेरिकेबाहेर कॉल सेंटर्स उभारणाऱ्या कंपन्यांना केंद्रीय अनुदान आणि सरकारकडून मिळणारे हमीकर्ज मिळणार नाही.
डेमॉक्रॅटिक पक्षाचे काँग्रेस सदस्य जेने ग्रीन आणि रिपब्लिकन पक्षाचे सदस्य डेव्हिड मॅककिनले यांनी हे विधेयक सादर केले. ‘अमेरिकी कॉल सेंटर आणि ग्राहक सुरक्षा कायदा’ असे त्याचे नाव आहे.
>२५ लाख कॉल सेंटर्स अमेरिकेत
डेमॉक्रॅटिक पक्षाचे काँग्रेस सदस्य जेने ग्रीन यांनी सांगितले की, ग्रेटर ह्युस्टन भागात ५४ हजार कॉल सेंटर्स आहेत. देशभरात २.५ दशलक्ष कॉल सेंटर्स आहेत. तथापि, अलीकडच्या काळात कॉल सेंटर्सच्या नोकऱ्या भारत, फिलिपिन्स आणि अन्य काही देशांत स्थलांतरित करण्यात येत होत्या. नव्या विधेयकाने याला चाप लागेल. टेक्सास आणि अमेरिकेच्या अन्य प्रांतातील हा व्यवसाय सुरक्षित करण्यातही मदत होईल.